मुंबई : बैल हा घोड्याप्रमाणे प्रदर्शनीय कवायती दाखवणारा प्राणी नाही. मुळातच बैल धावू शकत नसल्याने त्याला धावायला लावणे हीसुद्धा एक प्रकारची क्रूरता आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने बैलगाड्या शर्यतींवर लागू असलेली बंदी उठविण्यास नकार दिला. राज्यातील अनेक भागांत दिवाळीनिमित्त बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात येतात. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यात बैलगाड्या शर्यती होऊ शकणार नाहीत.राज्यात बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्याकरिता परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मनाई केली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत राज्यातील कोणत्याही भागात बैलगाड्या शर्यतींचे आयोजन होणार नाही. गेल्या सुनावणीत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शर्यतींदरम्यान बैलांना इजा होणार नाही, यासाठी काही नियमावली तयार केली आहे का? अशी विचारणा केली होती. नियमावली अस्तित्वात असली तर ती सादर करण्याचे निर्देशही राज्य सरकारला न्यायालयाने दिले. त्यानुसार, बुधवारच्या सुनावणीत राज्य सरकारने उच्च न्यायालयात नियमावली सादर केली. बैलगाड्या शर्यतींना परवानगी देण्यापूर्वी अनेक अटी घालण्यात आल्या असून त्यांची पूर्तता केल्यावरच शर्यतीला परवानगी देण्यात येईल, असे सरकारने न्यायालयाला सांगितले.
बैलगाड्या शर्यतींना बंदी कायम!, स्थगिती उठविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 4:03 AM