एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हायकोर्टाचा ‘ब्रेक’; स्थगितीनंतर आजच्या सुनावणीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 09:37 AM2021-11-04T09:37:34+5:302021-11-04T09:37:49+5:30
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून संप पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील सुमारे ३५ आगारांतील एसटी कर्मचारी संपावर असताना बुधवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यातील एसटी कर्मचारी संपावर जाण्याची भीती असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने या संपाला ‘ब्रेक’ लावला. न्यायालयाने संपाला स्थगिती देत गुरुवारी या याचिकेवर सुनावणी ठेवली. या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून संप पुकारला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आणखी काही संघटनांनी बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याबाबत एमएसआरटीसीला पत्र लिहिल्याने गुरुवारपासून एसटीचे संपूर्ण कामकाज बंद पडेल, या भीतीने एमएसआरटीसीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती.
‘कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या तरीही बेकायदेशीरपणे संप सुरूच आहे. एसटीची सेवा सार्वजनिक असल्याने आम्ही लोकांना सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र, मागण्या मान्य करण्यासाठी संप पुकारून काही कर्मचारी संघटना आम्हाला एक प्रकारे ब्लॅकमेल करीत आहेत, असा युक्तिवाद एमएसआरटीसीतर्फे ॲड. जी. एस. हेगडे व ॲड. पिंकी भन्साली यांनी केला.
गेली काही वर्षे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे. तरी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. मात्र, दिवाळीच्या दिवसांत संप पुकारून कर्मचारी सामान्य जनतेला विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला ज्यांना वाहतुकीसाठी एसटीशिवाय पर्याय नाही, अशा लोकांना वेठीस धरत आहेत. गेले काही आठवडे ग्रामीण भागातील लोकांची खूप गैरसोय होत आहे, असे एमएसआरटीसीने याचिकेत म्हटले आहे.
एसटीला दररोज ३.५ कोटींचा तोटा
विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्याचा फटका एसटी तिजोरीलाही बसला आहे. कारण, संपामुळे प्रवासीसंख्येत पाच लाखांची घट झाली असून दररोज सरासरी साडेतीन कोटींचे नुकसान होत आहे.
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉककाळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी ३५ आगारांतील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल हाेत आहेत. तर प्रवासीसंख्या घटल्यामुळे एसटीचेही दररोज साडेतीन कोटींचे नुकसान होत आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संपापूर्वी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या २७ लाख होती. यामध्ये घट होऊन ती २२ लाखांपर्यंत पोहीेचली आहे.