मुंबई : डाव्या बाहूच्या (फोरआर्म) आतील बाजूस ‘आई’ असे गोंदवून घेतल्याने अपात्र ठरविलेल्या पुणे जिल्ह्यातील रविकुमार सुभाषराव कराड या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलासा दिल्याने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘असिस्टंट कमांडन्ट’ म्हणून नोकरीची संधी मिळू शकणार आहे.
या पदासाठी अर्ज केल्यावर रविकुमार लेखी परीक्षा व शारीरिक क्षमता चाचणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले गेले. ६.५ किलो जास्त वजन व डाव्या बाहूवरील दोन सेंमी आकाराचे गोंदण या दोन कारणांवरून त्यांना पुढील तोंडी मुलाखतीच्या टप्प्यासाठी अपात्र ठरविले गेले. रविकुमार यांनी वजन कमी केले व लेझर उपचारांनी बाहूवरील गोंदणही बव्हशी काढून घेतले. तरीही पुसटशा दिसणाऱ्या (मूळ ठळकपणाच्या १० टक्के) गोंदणाच्या कारणावरून पुन्हा घेतलेल्या वैद्यकीय चाचणीतही त्यांना अपात्र ठरविले गेले.
रविकुमार यांनी याविरुद्ध याचिका केली. न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांनी रविकुमार यांच्यावतीने अॅड. एस. पी. कदम व अॅड. स्नेहा भांगे यांचा व केंद्र सरकारच्या वतीने अॅड. डी.ए. दुबे यांचा युक्तिवाद ऐकून घेतला व सैन्य , निमलष्करी दलांना लागू असलेला गोंदणाविषयीच्या अपात्रतेचा नियमही अभ्यासला. त्यावरून त्यांनी रविकुमार याच्या बाहूवरील गोंदण नियमाच्या आड येत नाही, असा सकृद्दर्शनी निष्कर्ष काढला. केंद्र सरकारने सविस्तर प्रतिज्ञापत्र करण्यासाठी वेळ मागितला. तसा वेळ दिला गेला. मात्र तोंडी मुलाखतीची तारीख चार दिवसांवर आहे हे लक्षात घेऊन खंडपीठाने, याचिकेवरील अंतिम निकालाच्या अधीन राहून, रविकुमार यांना तोंडी मुलाखतीत सहभागी होऊ द्यावे,असा आदेश दिला. त्यानुसार २४ जून रोजी त्यांची मुलाखत झाली.
न्यायालयाने म्हटले की, भारत हा सर्वधर्म समभावाचे तत्त्व पाळणारा देश असल्याने अंगावर धार्मिक चिन्ह गोंदविलेले असणे ही नियमानुसार अपात्रता नाही. मात्र हे गोंदण ज्या हाताने ‘सॅल्युट’ करतात त्या हातावर दृष्य भागात असता कामा नये, असे नियम सांगतो. रविकुमार यांनी गोंदवून घेतलेली ‘आई’ ही मराठीमधील अक्षरे हे तर धार्मिक चिन्हही नाही. त्यांचे हे गोंदण सॅल्यूट न करण्याच्या हाताच्या बाहूवर दृष्य भागावर असले तरी गणवेशाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट घातल्यावर हे गोंदण दिसणारही नाही. शिवाय लेझर उपचारांनी हे गोंदण ९० टक्के गेले आहे.वर्षभरातील दुसरे प्रकरणगेल्या ३० जानेवारी रोजी न्या. आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने श्रीधर महादेव पाखरे या सोलापूर येथील तरुणाच्या प्रकरणात असाच निकाल दिला होता. ती नोकरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) ‘शिपाई/वाहनचालक’ या पदाची होती. त्या प्रकरणात श्रीधरच्या उजव्या हाताच्या बाहूवर धार्मिक चिन्हे गोंदविलेले होते व त्यानेही ‘लेझर’ उपचारांनी ते ९० टक्के घालविले होते. शिवाय एकाच दलातील उप-निरीक्षक व शिपाई या पदांसाठी गोंदणाच्या बाबतीत असलेल्या नियमातील पक्षपाती भेदभाव हाही मुद्दा होता.