नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आघाडी करण्यावरून बोलणी 40 जागांवर थांबली असताना उर्वरित जागांचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसेने कंबर कसली आहे. याच पार्श्वभुमीवर आज सायंकाळी काँग्रेसचे अध्य़क्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली. यामध्ये यवतमाळ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला असून आता 7 जागांवर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रात युतीचे गुऱ्हाळ अद्याप सुरुच असून काँग्रेस आणि राष्टवादीने यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आघाडीसाठी 40 जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब झाले असून उर्वरित आठ जागांसाठी मित्रपक्षांनी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा करण्यासाठी आज सायंकाळी नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मर्लिकार्जुन खरगे हे देखिल उपस्थित होते.
ही बैठक संपली असून या बैठकीमध्ये आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झाली. यामध्ये यवतमाळसाठी काँग्रेसला झुकते माप देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अनुकूल असून ज्या ४० जागांविषयी वाद नाही, त्या प्रत्येकी २० जागा असे वाटप झाले आहे. उर्वरित ८ जागांबाबत चर्चा सुरू असून त्यापैकी काही जागा मित्र पक्षांसाठी सोडायच्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.