पुणे : गेल्या चार महिन्यांमध्ये सिमेंटच्या किंमतीत तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात मोठी वाढ झाली असून, त्याचा फटका घरांच्या किंमती वाढण्यामधे होण्याची शक्यता आहे. सरकारने सिमेंटच्या किंमतीवर नियंत्रण आणावे अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (क्रेडाई) वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सिमेंटच्या दरात अवाजवी वाढ झाल्याने घरांच्या किंमतीतही त्या प्रमाणात वाढ होऊन, परवडणाऱ्या घरांच्या उद्दीष्टाला खीळ बसेल. तसेच बांधकाम व्यवसाय सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे. तसेच यावर अवलंबून असणाऱ्या इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करणाऱ्या व्यवसायांवरही त्याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे या दर वाढीवर पुनर्विचार करून सरकारने सिमेंट कंपन्यांना दर वाढ कमी करण्याचे आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन क्रेडाई महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना असे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी दिली. क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले, बांधकाम व्यवसायामध्ये सिमेंट आणि स्टिलचा खर्च एकूण खर्चाच्या निम्मा असतो. गेल्या चार महिन्यांत सर्वच सिमेंट कंपन्यांनी भावात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे सिमेंटच्या गोणीचा भाव अडीचशेवरुन थेट ३३० ते ३४० रुपयांवर पोहचला आहे. जानेवारी ते मे या काळातच सर्वाधिक बांधकामे होत असतात. याच काळात भाववाढ झाल्याने बांधकाम खर्चातही वाढ झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या किंमतीत वाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही. देशात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहे. या भाववाढीमुळे या कामांच्या गतीला खीळ बसेल. त्यामुळे सरकारने जीवनावश्यक वस्तू प्रमाणे सीमेंटच्या भाववाढीवर नियंत्रण आणले पाहीजे. -----------------------कोणतेही कारण नसताना सिमेंट कंपन्यांनी भावात अचानक वाढ केली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला त्याचा फटका बसला आहे. भाववाढ नियंत्रणात न आल्यास परवडणाºया घरांच्या प्रकल्पाला गती देणे शक्य होणार नाही. याचा विचार करुन सरकारने भाववाढ नियंत्रणात आणली पाहिजे. शांतीलाल कटारीया, उपाध्यक्ष, राष्ट्रीय क्रेडाई-------------------
सिमेंटच्या गोणीचे भाव जानेवारी २५०फेब्रुवारी २९०मार्च-एप्रिल ३१०मे ३३०-३४०----------------