पुणे : राज्यात यंदा दहावीच्या निकालाने नवा उच्चांक गाठला आहे. मात्र आणखी एक अनोखा विक्रमही नोंदवला गेला आहे. तो म्हणजे परीक्षेदरम्यान शिक्षकांनीच केलेल्या गैरप्रकाराचा. एकट्या अमरावती विभागात परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना साहाय्य केल्याप्रकरणी तब्बल २३ शिक्षकांना पकडण्यात आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मागील काही वर्षांपासून परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्गाशी लढा’ ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमुळे परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र आहे. यंदा या मोहिमेदरम्यान शिक्षकच गैरप्रकार करताना आढळून आले. अमरावती विभागात विविध मार्गाने विद्यार्थ्यांना साहाय्य करताना २३ शिक्षक आढळून आले होते. तसेच राज्यात सर्वाधिक १५३ कॉपीचे प्रकारही आढळून आले आहेत.राज्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत गैरप्रकारांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी ७५७ गैरप्रकार आढळून आले होते. दहावीत यावर्षी ७२२ गैरप्रकार उघडकीस आले. तर २०१३मध्ये १,६४९ गैरप्रकार आढळून आले होते. यामध्ये अमरावती अव्वल असून, कोकण विभाग नवव्या स्थानावर आहे.
गैरप्रकारांत शिक्षकांच्या सहभागाचाही उच्चांक
By admin | Published: June 09, 2015 4:16 AM