नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी एक हायप्रोफाइल रेव्ह पार्टी ठाणेपोलिसांनी उधळून लावली आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेव्ह पार्टी करण्यासाठी जमलेल्या सुमारे १०० लोकांना ठाणे क्राइम ब्रँचने धाड टाकून ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील जंगलामध्ये काही तरुण आणि तरुणी नव्या वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. मात्र या रेव्ह पार्टीची कुणकूण पोलिसांना लागली आणि सगळ्याचा भांडाफोड झाला.
या रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर दारू आणि नशेची सामुग्री सापडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी धाड टाकली आणि सुमारे १०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात पाच तरुणींचाही समावेश आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे पोलिसांनी ही धाड टाकली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेकडो जणांपैकी दोघे जण असे आहेत ज्यांनी या रेव्ह पार्टीचं आयोजन केलं होतं. ठाणे क्राइम ब्रँडच्या पथकाने सुमारे २ वाजता ही कारवाई केली होती. छापेमारीदरम्यान पोलिसांच्या पथकाने एलएसडी, मरिजुआनासह विविध अवैध अमली पदार्थ सापडले आहेत. हे पदार्थ जप्त करण्यात आले आहे.