ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 12 - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट येथील वळण व उतारावर मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारा सिमेंटचा टँकर रस्त्याच्या मध्येच उलटल्याने मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिका बंद झाल्या होत्या. रविवारी सायंकाळी ५:३०च्या सुमारास हा अपघात झाला. लोणावळा-खंडाळा परिसरात दुपारपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू असल्याने मार्ग ओला व निसरडा झाला आहे.खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा सिमेंटचा टँकर (एमएच ४६ एएफ ३४००) हा वळण व उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे मुंबई व पुणे दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे दुतर्फा जवळपास आठ ते दहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सातच्या सुमारास सदर टँकर दोन क्रेनच्या साहाय्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बाजूला ओढत प्रथम मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. साडेसातला पुण्याकडे येणारी एक लेन सुरु करण्यात आली असून, टँकर रस्त्यामध्येच असल्याने पुण्याकडे येणाऱ्या दोन लेन बंदच होत्या. वाहतूक सुरळीत होण्यास किमान दोन तास लागतील असा अंदाज पोलिसांनी सांगितला आहे.रविवारची सुटी संपवून पर्यटनासाठी आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याने वाहतूककोंडीत भर पडली होती. द्रुतगतीवर वाहतूककोंडी झाल्याचे समजल्याने अनेकांनी राष्ट्रीय महामार्ग चारवरून लोणावळ्यातून जाणे पसंत केल्याने लोणावळा व खंडाळ्यातही मोठी वाहतूक कोंडी झाली होती.