अहवाल रेल्वे बोर्डाकडे : सिंदी येथे विस्तारणार रेल्वेचे जाळेनागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार नागपूर-सिकंदराबाद दरम्यान १६० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हायस्पीड रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर ते बल्लारशा दरम्यान रेल्वे मार्गाचा सर्वेक्षण अहवाल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मुंबई मुख्यालयात पाठविला होता. आता हा अहवाल मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी ‘लोकमत’ला दिली.एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर आले असताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले की, नागपूर-बल्लारशा रेल्वेमार्गावर हायस्पीड रेल्वे चालविण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. या मार्गाचा सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला आहे. नागपूर जवळील सिंदी येथे रेल्वेचे जाळे वाढविण्यात येणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला. त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. यात थर्डलाईन आणि दोन अतिरिक्त गुड्स ट्रॅक टाकण्यात येतील. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, सिंदीजवळ रिलायन्सचा प्लान्ट सुरू होत आहे. त्यासाठी दोन अतिरिक्त गुड्स ट्रॅक टाकण्यात येतील. ही एका दृष्टीने खाजगी सायडिंग राहणार आहे. दरम्यान आज सकाळी नागपुरात आल्यानंतर महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात नवनिर्मित लिफ्टचे उद्घाटन केले. त्यानंतर आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांशी विविध मुद्यांवर चर्चा केली. विभागातील रेल्वे रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या ई-सर्व्हिलन्स सिस्टीमचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. अजनी येथील क्रिकेट मैदानात खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन त्यांनी केले. त्यांनी अजनीत मध्य रेल्वेच्या भारत स्काऊट आणि गाईडतर्फे आयोजित १६ व्या अखिल भारतीय रेल्वे जम्बोरेट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष प्रीती सूद, नागपूरच्या अध्यक्ष संगीता सिंह, उपाध्यक्ष मोनिका गुप्ता आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हायस्पीड रेल्वेगाड्यांना मिळणार गती
By admin | Published: September 21, 2014 1:15 AM