निशांत वानखेडे / रुपेश उत्तरवारनागपूर/यवतमाळ : महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. या सात जिल्ह्यांना २०५० ते २०८० पर्यंत अत्याधिक तापमान आणि अत्याधिक पावसाचा सामना करावा लागेल.
जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, बोन, जर्मनीच्या वतीने येथील पोट्सडेम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने ‘नासा’च्या उपग्रहीय साधनांच्या आधारे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या सात जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. सरासरी पाऊस, पावसाचे चक्र, अति पावसाची वारंवारता, सरासरी तापमान, अत्यंत उष्ण दिवस आणि काेरडे दिवस या सात निकषांवर अभ्यास करून २०३०, २०५० आणि २०८० साली या जिल्ह्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावण्यात आला आहे. यासाठी हवामानाच्या ८ ते ९ माॅडेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी याबाबत माहिती दिली.
सात जिल्ह्यांत पावसाची स्थिती
- सरासरी पावसात २०३० ते २०५० पर्यंत १५ ते २० टक्के आणि २०५० ते २०८० पर्यंत २३ ते ३७ टक्के वाढ हाेईल.
- पावसाची तीव्रता २०५० पर्यंत ७ ते ११ मि. मी. व २०८० पर्यंत ८ ते १३ मि. मी.पर्यंत वाढेल.
- अति पावसाचे दिवस २०५० पर्यंत २५ ते ३० दिवस आणि २०८० पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.
- अत्याधिक पावसाची वारंवारता १ दिवस आणि ३ दिवसांपर्यंत वाढेल.
- अत्याधिक पावसाची तीव्रता २०५० पर्यंत १५, १८ ते २० टक्के आणि २०८० पर्यंत १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल.
तापमानाची स्थिती काय राहील?
- २०३० ते २०५० पर्यंत १.५ अंश आणि २०५० ते २०८० पर्यंत २.७ अंशापर्यंत वाढलेले असेल.
- अति तापमानाचे २०५० पर्यंत २५ ते ३० आणि २०८० पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.
- अत्याधिक काेरडे दिवस २०३० ते २०५० पर्यंत २ ते ३ आणि २०५० ते २०८० पर्यंत ४ ते ६ दिवस वाढतील.