अरुणकुमार मेहत्रे,कळंबोली- पनवेल-मुंब्रा महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत गॅरेज, गोदामे आणि दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यांना आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी कळंबोली सर्कलजवळ अशाच प्रकारे सहा गॅरेज जळून खाक झाले. ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. पोलिसांनी मात्र या घटनेची अकस्मित म्हणून नोंद केली आहे; परंतु सिडको, रस्ते विकास महामंडळ आणि पनवेल महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतेचे पाऊल उचलण्यात आले नाही.पनवेल परिसरातून जाणाऱ्या महामार्गांपैकी मुंब्रा-पनवेल हा महत्त्वाचा महामार्ग आहे. कळंबोली ते मुंब्रा हे २७ कि.मी अंतर असून कल्याण फाटा १७ कि.मी आहे. या महामार्गावरून जेएनपीटी आणि कळंबोली स्टील मार्केटकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. तसेच कल्याण, नाशिक आणि गुजरातकडे जाण्याकरिता या महामार्गाचा वापर करण्यात येतो. थोडक्यात मालवाहतुकीकरिता महामार्गाचा अधिक वापर करण्यात येतो. महामार्गालगत गॅरेज, पीओपी दुकानदार, भंगार, धाबे, हॉटेल्स आणि नर्सरी थाटण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री कळंबोली गावालगत असलेल्या गॅरेजला आग लागली. त्यामध्ये जवळपास पाच ते सहा गॅरेज जळून खाक झाली. येथे टायर साठवून ठेवण्यात आले होते. तसेच वाहनांना देण्याकरिता कलरचे डबे आणि लाकडी कोटिंग ठेवण्यात आली होती. या वस्तूंमुळे आगीने भडका घेतला. अग्निशमन दलाच्या जवांनी केलेल्या प्रयत्नामुळे आगीचे लोण इतर ठिकाणी पोहोचले नाही. काही महिन्यांपूर्वी काही मीटर अंतरावर कळंबोली पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या जुन्या टायरच्या गोदामाला आग लागली होती. त्याची झळ बाजूच्या इमारतींना बसली होती.मुंब्रा महामार्गालगत तळोजापासून ते शिळ फाटा यादरम्यान गोदाम बांधण्यात आली आहेत. काहींनी जागा विकत घेऊन तिथे लहान लहान गाळे काढले आणि ते पंधरा ते सोळा लाखाला विकले. तर अनेकांनीअतिक्र मण करून त्या जागेवर बस्तान बांधले आहे. या गोदामात विशेष करून भंगाराचा व्यवसाय केला जातो. ज्वलनशील वस्तूंची येथे साठवणूक केली जात असल्याने चार महिन्यांपूर्वी रोहिंजन गावच्या हद्दीत भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागली. आगीची इतकी तीव्रता होती की त्यामध्ये आठ गोदामांतील मालाची राख झाली. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायामुळे आजूबाजूच्या गावात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. संबंधित भंगारवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या संदर्भात रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गागुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता आपली बदली झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पदभार असलेले विश्वनाथ औटे यांचा फोन रविवारी बंद होता.>कळंबोलीत गॅरेजला आगतळोजा : पनवेल-मुंब्रा मार्गावर, कळंबोली वाहतूक शाखेच्या बाजूला असलेल्या गॅरेजला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कळंबोली येथील भगत गॅरेजच्या शेजारी असलेल्या असलेल्या एका गोदामाला शनिवारी अचानक लाग लागली. आगीची माहिती मिळताच कळंबोली, पनवेल, खारघर येथून अग्निशमनचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली.>महामार्गावरील अतिक्रमणांसंदर्भात एमएसआरडीला पत्र दिलेले आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने काही गॅरेज, गोदामांना उठविण्यात आले आहे. उर्वरित गॅरेजसुद्धा हटविण्यात येणार आहेत. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून महामार्गाची सुरक्षाही धोक्यात आली आहे. - गोरख पाटील, प्रभारी अधिकारी, कळंबोली वाहतूक शाखा
अतिक्रमणांमुळे महामार्ग धोक्यात
By admin | Published: February 27, 2017 2:04 AM