रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीउदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी ठणठणीत आहे. पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहितीही त्यांनी या ट्विटमधून दिली आहे.गेले काही दिवस मंत्रीउदय सामंत शासकीय कार्यक्रमांपासून दूर आहेत. रत्नागिरीतील प्रशासकीय कामांचा आढावाही ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी दोन्ही जिल्ह्यात मोहिमेचे काम इतर जिल्ह्यांप्रमाणे चांगले असल्याचेही सांगितले होते.
गेले काही दिवस शासकीय कार्यक्रमांपासून अलिप्त राहणाऱ्या उदय सामंत यांनी मंगळवारी ट्विट करून आपला कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेले दहा दिवस मी स्वत: क्वारंटाईन आहे. त्यामुळे मी स्वत: कोरोना चाचणी करून घेतली असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले दहा दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्याने संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांना काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.