मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
यासंदर्भात उदय सामंत यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार."
उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असली तरी ते क्वारंटाइन होऊन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज सुरु ठेवणार आहेत, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून सध्या यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनीही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या सर्वांनी कोरोनावर मात केली असून सध्या ते मंत्रिमंडळात काम करीत आहेत.
आणखी बातम्या...
- सुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार? एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल
- WhatsApp चॅट्स लीक होतायेत, मग 'या' सोप्या पद्धती वापरून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता
- सुट्टीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर वाचा कोरोना संबंधित सर्व राज्यांचे नियम