मुख्यमंत्री : राष्ट्रीय कार्यशाळेचे उद््घाटननागपूर : एकीकडे चांगले शिक्षण घेऊनही युवकांना रोजगार मिळत नाही तर दुसरीकडे उद्योजकांना आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला राज्यात सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर केले.अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्यावतीने झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ कार्यशाळेचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अविनाश पंत, प्रा. ए.एस.मन्था, उच्च व तंत्र शिक्षण विभागचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित. जेआयटीचे अध्यक्ष महेश साधवानी, सचिव वीरेंद्र कुकरेजा,व्हीएनआयटीचे प्रमुख डॉ. व्ही.आर. जामकर व्यासपीठावर उपस्थित होते.कौशल्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यावर सरकारचा भर असेल, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कौशल्य विकासाबाबत राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रमांची आखणी होत असताना मागील पाच वर्षांत २५ टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचे उदिष्ट साध्य होऊ शकले नाही. देशात ६५ टक्के युवकांची संख्या असून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. उद्योजकांनी स्थानिक विकासासाठी राखून ठेवलेल्या निधीतून कौशल्य विकास कार्यक्रम राबविल्यास हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तंत्र शिक्षण संस्थांनी रोजगारावर आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत, असे आवाहन डॉ. संजय चहांदे यांनी केले. प्रास्ताविक झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष महेश साधवानी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला आमदार आशिष देशमुख, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, जयप्रकाश सहजरामानी, प्राचार्य डॉ. एस.एस. लिमये, प्रमोद वैरागडे, माधवी वैरागडे, प्रमोद पामपटवार, तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)२० कोटी युवकांना प्रशिक्षणकौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील २० कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. मंत्रालयाच्या २० विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अविनाश पंत यांनी सांगितले. महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील १८ विषयांसंदर्भात कौशल्य विकास कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य
By admin | Published: January 05, 2015 12:51 AM