ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१- एकीकडे दुष्काळाने होरपळत असलेल्या नागरिकांना आता उष्ण तापमानाने चांगलेच घामाघूम केले आहे.गुरुवारी एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी 21 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत सोलापूरचे तापमान 44 अंश सेल्सियस एवढे होते. 1991 ते 2016 या पंचवीस वर्षांत तीन वेळा सर्वात उष्ण तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, 2 मे 2015 हा दिवस सोलापुरात सर्वात उष्ण दिवस नोंदविला गेला होता. त्यावेळी सोलापूरचे तापमान 45 अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले होते. यावर्षीची भीषण स्थिती पाहता पुन्हा एकदा ही पुनरावृत्ती होण्याची चिन्हे हवामान तज्ञांनी वर्तविली आहेत. सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून सातत्याने तापमानाचा आलेख वाढू लागला आहे. मार्च महिन्यात 11, 12, 18,19,20,21 रोजी 40 अंश सेल्सिअस तापमान पार केले होते. एप्रिल महिन्यात पाण्याच्या टंचाईबरोबर उष्णतेची लाटही मोठया प्रमाणात पसरू लागली आहे. विदर्भानंतर सोलापूर शहर हे अतिउष्ण शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. दुपारी 12 नंतर शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. दरम्यान शहरात पाण्याच्या अनियमिततपणा मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े