मुंबई / पुणे : सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. गोदावरीला पूर आल्यामुळे नाशिक, पैठणमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कृष्णा, पंचगंगेसह इतर मोठ्या नद्यांनी धोक्याची रेषा ओलांडली आहे. याशिवाय छोट्या नद्या, ओढेही दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या २४ तासांत कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.नाशिकमधील दहा धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नाशिकसह औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणसह तीन तालुक्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात गोदावरीकाठी राष्ट्रीय आपत्कालीन पथक तैनात केले आहे. पुराच्या पाण्यामुळे औरंगाबाद-नाशिक महामार्ग बंद झाला असून सायंकाळी वाहतूक ठप्प झाली होती. नाशकात तीन जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चांदोरीत ११ जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. कोपरगावातही (नगर) गोदाकाठी डाऊच बुद्रुक येथेही पुराच्या पाण्यात २२ जण अडकले आहेत. संततधार पावसामुळे गंगापूर, दारणा, पालखेड, नांदूरमधमेश्वर, भावली, मुकणे, कडवा, आळंदी, भोजापूर व चणकापूर या दहा धरणांतून पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आल्याने गोदावरीला पूर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक व जिल्ह्यातील शाळेला सुटी जाहीर केली. पालकमंत्री गिरीश महाजन तातडीने नाशकात दाखल झाले आहेत. मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला. औरंगाबाद शहरात मंगळवारी धुवाधार पाऊस झाला. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. बीड, जालना नांदेड, परभणी जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>घाटमाथ्यावर मुसळधारघाटमाथ्यावरील दावडी २२०, शिरगाव, ताम्हिणी २१०, डुंगरवाडी १७०, अम्बोणे, खांद १६०, भिरा, वाणगाव, भिवपुरी १५०, कोयना (पोफळी) १४०, लोणावळा(टाटा) ११०, शिरोटा, कोयना (नवजा), वळवण, खोपोली १००, लोणावळा(आॅफिस) ९०, ठाकूरवाडी ७०मिमी पाऊस झाला आहे़
नाशिक, पैठणमध्ये पुरामुळे हायअलर्ट
By admin | Published: August 03, 2016 6:02 AM