- प्राची सोनवणे, वैभव गायकर नवी मुंबई : शहरातील मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा उडाला असून, नालेसफाई, तलावांची स्वच्छता न झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गणेशाचे आगमन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. तरी नवी मुंबई, पनवेल परिसरातील बहुतांशी विसर्जन तलावांची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान भाविकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र पाहायला मिळते.तलाव परिसरात सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असूनही हे सुरक्षारक्षक जागेवर नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी गैरप्रकार होत असल्याने परिसरातील महिला तसेच विद्यार्थ्यांना असुरक्षित वाटत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. याठिकाणी रात्रीच्या वेळी मद्य पार्टी सुरू असून, तलाव परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तीज सणामुळे तलाव परिसरातील निर्माल्य वेळीच उचलण्यात आले नसून परिसर अस्वच्छ झाला आहे. नवी मुंबई महापालिकेने तलाव व्हिजन मोहीम राबवून तलावांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रु पये खर्च करून तलावांचे सुशोभीकरण केले. परंतु शहरातील काही तलावांची देखभाल न केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर तलावाच्या बाजूला वाहने धुण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून तलावांचा वापर केला जात आहे. बेलापूर, घणसोली, वाशी, कोपरी, रबाळे, कोपरखैरणे परिसरातील तलावांची दुरवस्था झाली आहे.वाशीतील कोपरी गावाजवळच्या महापालिकेच्या तलावात दररोज टँकर, ट्रक, टेम्पो, डम्परसारखी वाहने धुतली जातात. त्यामुळे रसायने, ज्वालाग्राही पदार्थ आणि इंधन तलावात मिसळून पाणी दूषित होत असते. या तलावात ग्रामस्थांनी मासे सोडले होते. ते दूषित पाण्यामुळे मृत पावत आहेत. या तलावाजवळ गॅरेज आहेत ते हटवल्यास येथे वाहने धुण्याचे प्रकार कमी होतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आग्रोली तलावात झालेल्या दुर्घटनेनंतरही याठिकाणी सुरक्षारक्षक जागेवर नसल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक तसेच नागरिकांनी केली आहे. या तलावाचे सुशोभीकरणाचे काम अद्यापही रखडले असून या गणेशोत्सवात मात्र भाविकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोर्डाच्या वतीने नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक कधीच जागेवर नसल्याने तलाव परिसराचा गैरवापर केला जातो. जवळपासच्या गावातील स्थानिक तरुणांची या ठिकाणी नेमणूक केली जावी, अशी मागणी नगरसेविका सरोज पाटील यांनी केली आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी देखील मिळेल आणि या तरुणांना या परिसराची माहिती तसेच तलावाची खोली आदीबद्दल माहिती असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सुरक्षा यंत्रणेवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.नवी मुंबई परिसरात आग्रोली, बेलापूर गाव, दारावे, करावे, किल्ले गावठाण, नेरुळ सेक्टर २०,शिरवणे, जुहूगाव, कोपरी, वाशीगाव, सानपाडा, तुर्भेगाव, खैरणे, कोपरखैरणे, महापे, सावलीगाव, गोठिवली, गुलनाली, राबाडा, तळवली, ऐरोली नाका, दिवा, बोरोला, खोकड आदी २४ तलावांचा समावेश आहे.विसर्जन घाटांवर कचºयाचे साम्राज्य
शहरातील विसर्जन तलावांची दुरवस्था,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 7:02 AM