मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीने अवघ्या तीन जागांवर घटकपक्षांची बोळवण केल्यानंतर महाआघाडीतील धुसफुस वाढली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर आता आमदार कपिल पाटील यांनी महाआघाडीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही मुद्द्यांची वा अजेंड्याची चर्चा न करता मित्रपक्षांना परस्पर तीन जागा टेकविल्याबद्दल पाटील यांनी खुले पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.लोकतांत्रिक जनता दलाचे नेते कपिल पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना खुले पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरूप येऊ शकणार नाही. आंबेडकर, राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली व अन्य पक्षांना विधानसभेत जागा सोडण्याचे आश्वासन दिले की आघाडी झाली, असे मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.चाळीस ते पन्नास टक्के वर्गाच्या प्रश्नाला महाआघाडी अजेंड्यावरच स्थान नसेल तर आंबेडकर यांच्याशी सन्मानाने चर्चा कशी होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. मुद्दे वा अजेंड्याची चर्चा न करता मित्र पक्षांना तीन जागा सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचे जाहीर केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच छोट्या डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचे काम करायचे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. किमान, वाजंत्री कोणत्या मुद्द्यांची वाजवायची हे तरी स्पष्ट करा, असेही ते म्हणाले.
जागावाटपावरून महाआघाडीत धुसफुस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 7:09 AM