यवत : यवतमध्ये मागील आठवड्यात पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना घडलेल्या अपघातात दोन तरुणांना प्राण गमवावा लागल्याची घटना ताजी असताना मंगळवारी (दि.१) दोन वेगवेगळ्या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली, तर एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला आहे. सदर दोन्ही अपघातांत महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना भरधाव वाहानाने धडक दिली आहे.अपघातात कोंडाबाई ज्ञानदेव पानवलकर (वय १०८ वर्षे, रा. यवत, ता. दौंड) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली. महामार्ग ओलांडत असताना पुण्याकडून येणाऱ्या कारने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. हा अपघात सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास यवत येथे भुलेश्वर फाट्याजवळ झाला.दुसरा अपघातदेखील महामार्ग ओलंडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा झाला. महामार्ग ओलांडत असताना गजानन भुजाबा तांबे (वय ६२, रा. यवत, ता. दौंड) यांना पुणे बाजूकडून येणाऱ्या चारचाकी मोटारीने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान बसस्थानकानजीक घडला. तांबे यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. तपास पोलीस हवालदार भागवत शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)महामार्गावरील अपघातांची मालिका पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, महामार्ग ओलांडताना अजून किती लोकांचे जीव जातात, याचे जणुकाही मोजदात करण्याचे काम सुरू आहे. त्याप्रमाणे अपघात घडत आहेत. काल (दि.१) रोजी ऐन भाऊबीजदिवशी आणखी दोन अपघात घडले. यात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली, तर दुसऱ्या अपघातात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
महामार्ग ओलांडणे बनले धोक्याचे
By admin | Published: November 03, 2016 1:30 AM