लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था सर्वश्रुत आहे. या दुरवस्थेमुळेच महामार्गावर असंख्य अपघात होत आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण होणार? हे कारण सांगत, गेले वर्षभर महामार्गाचे अधिकारी महामार्गाच्या दुरवस्थेच्या कामांकडे चालढकल करीत होते. मंगळवारी सावित्रीनदीवरील पुलाचा उद्घाटन समारंभ जाहीर झाला. त्यासाठी मंत्री आणि राजकीय बडे कार्यकर्ते महाडला येणार, या कारणास्तव महामार्ग विभागाने माणगाव ते महाडदरम्यान खड्डे बुजविण्याचे, तसेच अनेक ठिकाणी खचलेल्या महामार्गाचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मंत्र्यांच्या दिमतीला सज्ज झालेल्या महामार्ग अधिकाऱ्यांच्या विरोधात या प्रकरणी संतापाची लाट निर्माण होत आहे.पनवेल ते इंदापूर हा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा संथगतीने सुरू आहे. तर इंदापूर ते कशेडी, असा दुसरा टप्पा गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित चौपदरीकरणाच्या चर्चेत आहे. चौपदरीकरणासाठी मापणी आणि नोटिशी बजावण्याची कामे सुरू असल्याने महामार्गावर खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. ही सबब पुढे करत महामार्ग विभागाचे अधिकारी गेले वर्षभर, दुरुस्तीच्या कामाकडे चालढकल करत होते. माणगाव ते पोलादपूर दरम्यान जवळपास २० ठिकाणी महामार्ग खचला आहे. रस्त्याचा पृष्ठभाग खचल्याने महामार्गावर खड्डासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी वेगवान वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची भीती कायम होती. वृत्तपत्रांतून याबाबत अनेक सचित्र वृत्तदेखील प्रसिद्ध झाली होती. येथे अपघात होऊन अनेक प्रवासी जायबंदीदेखील झाले होते. मात्र, याची कोणतीच दखल महामार्ग विभाग घेत नव्हता.गतवर्षी पावसाळ्यात वाहून गेलेल्या सावित्री पुलाला बांधण्यात आलेला पर्यायी पूल नुकताच पूर्ण झाला आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी होणार असून, या शासकीय कार्यक्रमास येणाऱ्या मान्यवरांना महामार्गावरील या खचलेल्या रस्त्याचा त्रास सहन करावा लागू नये, म्हणून दोन दिवसांपूर्वी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी खचलेल्या महामार्गावरील खड्डे बुजवले. याबाबत महाड आणि परिसरात सध्या चर्चा सुरू आहे. वर्षभर दुर्लक्षित केलेले खचलेले महामार्ग अचानकपणे भरण्याचा पराक्रम करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई केली जावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.माणगाव ते पोलादपूर दरम्यान जास्त अपघातमाणगाव ते पोलादपूर दरम्यान एका वर्षामध्ये १४१ अपघात झाले. २२ मृत्यू झाले, तर १४८ जखमी झाल्याची नोंद महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्याकडे आहे. या अपघातामध्ये जास्त प्रमाणात खचलेल्या ठिकाणीच अपघात आहेत. इतर छोट्या-मोठ्या अपघातांची तर नोंद नाही. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड वर्षाचा होता. तर एवढे अपघात होईपर्यंत महामार्ग विभाग गप्प का होता. सध्या खचलेल्या महामार्गाचे व खड्डे भरण्याचे काम माणगाव ते महाड सावित्री पुलापर्यंतच करण्यात येत असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.महामार्गाच्या दुरुस्तीचे काम अचानकपणे झाले. या प्रकरणी महाड येथील राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता प्रकाश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रथम याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र, हे काम डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमधून आमिश कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून केले जात असल्याचे सांगितले. जर का महामार्गाच्या कामाला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड चालू होता, तर मग याआधीच हे दुरुस्तीचे काम का करण्यात आले नाही? मंत्री आणि मान्यवर राजकारण्याच्या आगमनाचा मुहूर्त रस्ता दुरुस्तीसाठी का पाहण्यात आला? मंत्री महोदय जर आले नसते, तर डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये हे काम झाले असते का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित के ले जात आहेत.
महामार्गाची एका दिवसात केली दुरुस्ती!
By admin | Published: June 05, 2017 2:58 AM