विज्ञान भारतीच्या अधिवेशनाचा समारोप : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर : सध्या ‘लॅब’ मध्ये बंदिस्त असलेले विज्ञान-तंत्रज्ञान तळागळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच विकासाचा राजमार्ग प्रशस्त होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, जलवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विज्ञान भारतीच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी आयटी पार्कमधील कवि कुलगुरू कालिदास सभागृहात समारोप पार पडला. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर होते. अतिथी म्हणून विज्ञान भारतीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विजय भटकर, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, मनमोहन वैद्य, डॉ. व्ही. के. सारस्वत, के. ई. बासू, विज्ञान भारतीचे सहसचिव जयकुमार व जयंत सहस्रबुद्धे उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, देशातील वैज्ञानिक चांगले काम करीत आहे. परंतु त्यांच्यात आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी हा दुरावा दूर करावा लागेल. याशिवाय केंद्रीयस्तरावर एक ‘थिंक टॅँक’ तयार केली जाणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या या समितीमध्ये विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश राहणार आहे. गंगा नदीच्या शुद्धीकरणाविषयी बोलताना, ते म्हणाले, या नदीत सोडण्यात येणाऱ्या खराब पाण्याचा कसा उपयोग करता येईल, यावर विचार केला जात आहे. तसेच देशातील आयात व निर्यात शुल्कात सध्या सुमारे ३०० बिलियन डॉलर्सची तफावत आहे. ती कमी करण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार करून इथेनॉलचा वापर वाढविण्याची गरज आहे. मात्र हे सर्व करताना पर्यावरणाचा समतोल राखावा लागेल. यासाठी रस्त्यावरील मोठ्या झाडांची कटाई न करता, त्यांचे प्रत्यारोपण व नरेगातर्गंत नवीन वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अनिल काकोडकर यांनी विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना समग्र व एकात्मिक दृष्टिकोनातून विज्ञानाची चर्चा व्हावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञानाच्या बळावर विकासाचा राजमार्ग
By admin | Published: June 30, 2014 12:48 AM