नवी मुंबई : तुर्भे स्टोअर येथून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या मुलीची पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सुटका केली आहे. त्याच परिसरातील तरुणाने द्वेषातून हे कृत्य केले होते. परंतु तो रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी सोलापूरमधील कुर्डुवाडी स्थानकातून त्याला अटक केली.इम्तीयाज मुन्ना खान (२०) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. काही महिन्यांपासुन तो तुर्भे स्टोअरमध्ये रहायला होता. यादरम्यान त्याच परिसरात राहणाऱ्या रफीक खान यांच्यासोबत कौटुंबिक संबंध निर्माण केले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून इम्तीयाजच्या मनात त्या कुटुंबाविषयी द्वेष निर्माण झाला होता. याच द्वेषातून रफीक खान यांच्या कुटुंबाला आपल्यापुढे नमते करण्यासाठी त्याने त्यांची दोन वर्षाची मुलगी आलीया हिला पळवून नेले होते. मुलगी बेपत्ता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रफीक यांनी परिसरात शोधाशोध करुनही ती सापडली नाही. शिवाय इम्तीयाज हा देखील त्याच्या घरी नव्हता. अखेर त्यांनी तुर्भे पोलिसांकडे यासंबंधीची तक्रार केली. प्रथमदर्शनीच पोलिसांना हे प्रकरण गांभीर्याचे वाटल्यामुळे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक राहुल खताळ, उपनिरीक्षक भूषण कापडणीस यांचे पथक तयार केले होते. एकीकडे तक्रार नोंदवण्याचे काम सुरु असतानाच या पथकाने संशयित इम्तीयाजचा शोध घ्यायला सुरवात केली. यादरम्यान उपनिरीक्षक प्रदीप सरफरे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाला सुरवात केली असता, तो लोणावळ्याच्या दिशेने जात असल्याचे समजले. यावरुन त्याच्यावरील संशय बळावल्याने उपनिरीक्षक कापडणीस हे पोलीस नाईक दत्ता भोरे व संजय कनोज यांचे पथक तत्काळ लोणावळ्याला रवाना झाले. परंतु पोलिसांचे पथक त्याठिकाणी पोचले असता, तो सोलापूरच्या दिशेने रेल्वेने जात असल्याचे पोलिसांना समजले. परंतु तो नेमके कोणत्या रेल्वेत आहे, हे पोलिसांना कळू शकले नव्हते. अखेर कार्यतत्परता दाखवत त्यांनी कुर्डुवाडी पोलिसांसोबत असलेल्या ओळखीचा आधार घेतला. तुर्भे पोलिसांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज निकम यांना संशयित इम्तीयाजविषयी कळवताच त्यांनी फुलन कस्तुरे व रमेश मांडे यांच्यासह रेल्वेस्थानकात धाव घेतली. यावेळी स्थानकात उभ्या असलेल्या मुंबईवरुन आलेल्या एक्स्प्रेसमध्ये जावून त्यांनी शोधाशोध केली असता इम्तीयाज आढळून आला. तसेच त्याच्यासोबत आलीया आढळल्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगितले.तुर्भे पोलिसांनी कार्यतत्परता दाखवल्यामुळे अपहरण झालेल्या आलीयाची अवघ्या काही तासात सुटका झाली, अन्यथा रफीक यांच्या कुटुंबावर असलेल्या द्वेषाच्या भावनेतून इम्तीयाज हा त्यांच्या चिमुरडीला घेवून अज्ञात ठिकाणी जायच्या तयारीत होता. त्यापूर्वीच पोलिसांनी केवळ संशयाच्या आधारे सापळा रचून त्याला अटक केली आहे. तसेच दोन वर्षांच्या आलीयाची सुखरूप सुटका करून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.
अपहृत चिमुरडीची सुटका
By admin | Published: August 04, 2016 2:16 AM