ठाणे : समोसे घेण्यासाठी बाहेर पडलेल्या मनोरमानगर येथील प्रियंका शर्मा (वय ९) या मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न रिक्षाचालकाने केला, पण त्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवत रिक्षातून उडी मारत स्वत:ची सुटका करून घेतली. रिक्षाचालक देवी यादव (६२) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. मनोरमानगर येथून त्याने मुलीला पळविल्यानंतर गोल्डन डाइज नाक्याजवळ वाहतूककोंडीमुळे रिक्षाची गती कमी झाली, तेव्हा तिने मोठ्या धाडसाने रिक्षातून उडी टाकली.प्रियंका मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ती मनोरमानगर येथे घराजवळच समोसे घेण्यासाठी बाहेर पडली होती. त्याच वेळी यादवने तिला गाठले. ‘तुला घरी सोडतो,’ असे म्हणत त्याने तिला रिक्षात बसण्याची गळ घातली. तिने नकार दिल्यानंतरही त्याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसविले. नंतर रिक्षा मुंब्य्राच्या दिशेने नेली. आपण वेगळ््या रस्त्याने जात आहोत, हे त्या चिमुकलीच्या तत्काळ लक्षात आले. साधारण पंधरा मिनिटे गेल्यावर गोल्डन डाइज नाक्याजवळ वाहतूक कोंडीमुळे रिक्षाची गती कमी झाली. तिने संधी साधत तिने मोठ्या धाडसाने रिक्षातून उडी मारली. त्यानंतर, नाशिक मार्गावर बाहुल्या विकणाऱ्या एका महिलेला पाहून ती तिच्याजवळ गेली आणि घाबरून तेथेच बसली. या महिलेने काळजीने तिची विचारपूस केल्यावर घडलेला सारा प्रकार तिने सांगितला. मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे लक्षात येताच, तिने कापूरबावडी पोलिसांना याची माहिती दिली. मुलीने वडिलांचा फोन क्रमांक दिल्यानंतर त्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. मुलीकडून रिक्षा आणि चालकाचे वर्णन मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर, उपनिरीक्षक श्रीकांत पवार यांनी बिट मार्शलच्या मदतीने तपासाअंती त्याला ताब्यात घेतले. मुलीला पळून नेण्यामागचे कारण त्याने अजून पोलिसांना सांगितलेले नाही. पोलिसांनी जाब विचारण्यापूर्वीच जमिनीवर लोटांगण घेऊन त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती बारावकर यांनी दिली. दुसरीत शिकणारी प्रियंका बोलकी आहे. याच्या जोडीलाच ती तितकीच धाडसी असल्याचेही मंगळवारी रिक्षातून तिने उडी मारून अपहरणाचा डाव उधळून लावल्यामुळे स्पष्ट झाले. तिच्या धाडसाचे पालकांसह पोलिसांनीही कौतुक केले. (प्रतिनिधी)
रिक्षातून उडी टाकून उधळला अपहरणाचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 2:16 AM