- सागर चव्हाण/ऑनलाइन लोकमत
‘कास’ पठारावरची फुलं पाहून जपानी पर्यटकांच्या तोंडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया
पेट्री ( सातारा ), दि. 10 - जैवविविधतेने नटलेल्या कास पठाराने आपल्या दुर्मीळ विविधरंगी फुलांच्या गालिच्याची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली. फुलांचा हंगाम सुरू होताच देश-विदेशातील पर्यटक कास पठाराला भेट देऊ लागले आहेत. शुक्रवारी जपानच्या परदेशी पाहुण्यांनी कास पठाराला भेट दिली. पठारावरील फुलं पाहून भारावलेल्या या परदेशी पाहुण्यांनीही आपल्या भाषेत ‘हिजो नी उत्सूकुशी हाना’ म्हणजेच ‘खूप सुंदर फुले’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिली.
सातारा शहराच्या पश्चिमेस असलेले कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आाहे. विविधरंगी दुर्मीळ फुले हेच या पठाराचे मुख्य वैशिष्ट्य. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने असंख्य पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. विस्तृत पठार, ठिकठिकाणी कोसळणारे छोटे छोटे धबधबे, हवेतील थंडगार गारवा, चोहोबाजूला हिरवा निसर्ग, अधूनमधून दिसणारी धुक्याची दुलई त्यात नजर जाईल तिकडे विविधरंगी दुर्मीळ फुलांचे ताटवे असा मनाला मोहिनी टाकणारा स्वर्गीय सौंदर्याचा निसर्ग परदेशी पाहुण्यांना भुरळ पाडत आहे.
चालू वर्षी कास पठाराला भेट देणाºया जपानच्या परदेशी पाहुण्यांनी गतवर्षी देखील कास पठाराला फुलांच्या हंगामात भेट दिली होती. यंदाही जपानमधील काही पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. तसेच येथील प्रत्येक फुलाची त्यांनी बारकाईने पाहणी केली. निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागताना या पाहुण्यांनी ‘हिजो नी उत्सूकुशी हाना’ असं सांगून कासची फुले किती सुंदर आहे हे आपल्या भाषेत सांगितले. या अगोदर इंग्लड, जर्मनी या देशांतील परदेशी पाहुण्यांनीही कासला भेट दिली आहे.