मुंबई : मुंबई मेट्रोची भाडेवाढ पुन्हा एकदा टळली आहे. मेट्रो भाडेवाढीच्या याचिकेवरची सुनावणी २४ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. गुरुवारच्या सुनावणीत एमएमआरडीए आणि रिलायन्स या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील तांत्रिक बाबी सुधारण्यासाठी अर्ज केल्याची माहिती उच्च न्यायालयाल दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या स्पष्टीकरणासाठी गेल्या सुनावणीच्या वेळी न्या. अभय ओक व न्या. सी.व्ही. भडंग यांनी या मेट्रो भाडेवाढीसंदर्भातील याचिकेरवील सुनावणी तहकूब केली. गुरुवारच्या सुनावणीवेळी एमएमआरडीए आणि रिलायन्सने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला असून, पुढील आठवड्यात यावर सुनावणी होईल, अशी माहिती खंडपीठाला दिली. त्यामुळे खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. त्यामुळे मुंबईकरांना काही काळ दिलासा मिळाला आहे. याआधीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो वन या कंपनीवर सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल ताशेरे ओढले होते. उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर रोजी मेट्रोच्या भाडेवाढीला २९ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, प्रस्तावित भाडेवाढ कशा प्रकारे योग्य आहे, हे सांगत मुंबई मेट्रो वन लिमिटडने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. १ डिसेंबर २०१५पासून वर्सोवा-घाटकोपरदरम्यान मेट्रोच्या भाड्यात ५ रुपये वाढ करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वनने घेतला. या निर्णयाविरुद्ध एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (प्रतिनिधी)
मेट्रोची भाडेवाढ तूर्तास टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2016 3:18 AM