संदीप गावंडे / ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 31 - चांदुरबिस्वा येथील हिंदू-मुस्लिमांनी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी येथील मदरशामध्ये एकत्र जमून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत तसेच दिवाळीचे फराळ सर्वांना वाटत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. या माध्यमातून जातीय सलोख्याचा संदेश देण्यात आला.
चांदुरबिस्वा हे येथील महत्वाचे मोठे गाव असून येथे सर्व समाज गुण्यागोविदांने राहतात. गणपती, नवरात्र उत्सवात येथे मुस्लिम बांधवही उत्साहाने सहभागी होतात. यावर्षी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोषराव पाटील यांनी हिंदु मुस्लिम बांधवांनी एकत्र मिळून दिवाळी साजरी करण्याचा विचार सर्वांसमोर मांडला असता सर्वांनीच होकार दर्शविला. यानुसार दिवाळीच्या दिवशी येथील मदरशामध्ये एकत्रित येत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
चांदुरबिस्वा येथील मदरशात जवळपास साठ ते सत्तर विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांकरीता संतोषराव पाटील यांनी फराळाची व्यवस्था केली तसेच सकाळी गावातीलहिंदु-मुस्लिम बांधवांनी मदरशामध्ये उपस्थित राहून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत दिवाळीचे फराळ केले.
चांदुरबिस्वा येथील या सामाजिक ऐक्य साधणाºया व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाºया दिवाळीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.