कुमार बडदे लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : रमजान महिन्यात मुस्लिमांना वेळेत इफ्तारी (उपवास सोडता यावा) करता यावी. यासाठी दोन हिंदू महिला स्वत:च्या घरची कामे सोडून दररोज संध्याकाळी तीन तास इफ्तारची तयारी करतात. यातील एका महिलेच्या आईला अर्धांगवायूचा झटका आलेला आहे. मात्र आईला घरी एकटीला सोडून ही महिला इफ्तारच्या तयारीकरिता येते. नेहमीच दहशतवाद्याच्या वास्तव्यामुळे वादात राहणाऱ्या मुंब्रा शहरात हिंदू-मुस्लीम ऐक्याची अशी उदाहरणे आहेत हे यामुळे अधोरेखित झाले आहे.रमजानमध्ये उपवास सोडण्यासाठी संध्याकाळी घरी वेळेत पोहचण्याची मुस्लिमांची धडपड सुरु असते. मात्र कामातील व्यस्ततेमुळे काहीजण वेळेत घरी पोहचू शकत नाहीत. त्यांच्यासाठी काही तरु ण मागील काही वर्षापासून मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र मांक एकवर दोन ठिकाणी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि पाणी ठेऊन इफ्तारची व्यवस्था करतात. त्याचा लाभ मुंब्रा, कल्याण, अंबरनाथ इत्यादी ठिकाणचे हजारो रोजेदार दररोज घेतात. मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणाऱ्या या इफ्तारसाठी दररोज विविध प्रकारची चाळीस ते पन्नास किलो फळे कापावी लागतात. यासाठी अनेक हाताची गरज लागते. परंतु रमजानच्या काळात मुस्लिम घरांमध्ये देखील संध्याकाळी इफ्तारची तयारी सुरु असते. त्यामुळे त्या समाजातील महिलाची इच्छा असून देखील त्या फलाटावरील इफ्तारीच्या तयारीसाठी वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे उपलब्ध महिलांची प्रचंड धावपळ होते. त्यांची धावपळ कमी व्हावी आणि इफ्तारीची तयारी वेळेत पूर्ण व्हावी. यासाठी मुंब्रा रेतीबंदर परिसरात रहाणाऱ्या पुष्पा घाडगे आणि मीना यादव या दोन महिला स्वत:च्या घरची कामे बाजूला ठेऊन अनेक वर्षापासून दररोज संध्याकाळी तीन तास फळे कापण्याकरिता तसेच ती प्लॅटफॉर्मवरील मुस्लीम बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी इफ्तारीची वेळ संपेपर्यत हजर राहतात.
इफ्तार तयारीसाठी झटतात हिंदू महिला
By admin | Published: June 21, 2017 4:38 AM