मुंबई: सध्या राज्यात हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोग्यांमुळे राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. शिवसेनाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बोचरी टीका केली आहे.
'पवार-गांधींकडे हिंदुत्व गहाण ठेवलं'केशप उपाध्ये नेहमीच सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सरकारवर टीका करताना दिसतात. अशाच एका फेसबुक पोस्टमधून त्यांनी परत एकदा सरकारला धारेवर धरले. "भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना नुकतेच दिलेत म्हणे. त्यात भाजपाचं हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितलंय. पण ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय. ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध केवळ बोलण्यापुरता राहिलाय. त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर बोलूच नये,'' अशी टीका उपाध्ये यांनी केली.
'शिवसेनेचं हिंदू हित शून्य'ते पुढ म्हणतात, "हिंदुत्व भाजपासाठी आत्मा आहे. तुमच्यासारखं गरज असेल तेव्हा वापरलं आणि नसेल तेव्हा सोडून दिलं, अलं आम्ही कधी केलं नाही. म्हणूनच राम मंदिर, कलम 370 सारखे मुद्दे आम्ही मार्गी लावले. आज तुम्ही हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतलीत तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील, म्हणूनच तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेताय, त्यात हिंदू हित शुन्य आहे.''
'तुमची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी'
''थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झालीय. तो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, त्याकडून बाकी काही होणे शक्य नाही. तुमच्या नाकर्त्या कारभारामुळे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून ‘तुटले’ आहेतच. ‘पडा’यचे बाकी आहे, ते निवडणुकीत होऊन जाईल,'' असा घणाघातही त्यांनी केला.