पुणे : शिवसेनेकडून युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजपा पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात उभे टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे हिंदुत्ववादी विचाराला मानणाऱ्या सेना-भाजपाच्या परंपरागत मतांमध्ये मोठया प्रमाणात विभाजन होणार आहे. कसबा पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ कोथरूड, कर्वेनगर, बावधन, पाषाण येथल्या प्रभागांसह उपनगरांमध्ये सेना-भाजपाच्या उमेदवारांना याचा फटका बसण्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यात भाजपासोबत यापुढे कधीही युती करणार नसल्याची घोषणा केली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये याचे जोरदार पडसाद उमटणार आहेत. शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना मानणारा असा भाजपाचा स्वत:चा परंपरागत मतदार आहे. त्याचबरोबर, शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे. या दोन्ही विचारांच्या मतदारांची एकगठ्ठा मते मिळवून, शहरातल्या विविध भागांमध्ये सेना व भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभेत भाजपाला आठ जागा मिळाल्या. वडगावशेरी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा अत्यंत थोड्या मतांनी पराभव झाला. त्यानंतर, भाजपाने इतर पक्षांमधील अनेक आजी-माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे. (प्रतिनिधी)
हिंदुत्ववादी मतांचे होणार विभाजन?
By admin | Published: January 28, 2017 1:03 AM