मुंबई - हिंगणघाट जळीत पीडितेची मृत्यूची कडवी झुंज अपयशी ठरली आहे. सात दिवसाच्या अथक उपचारानंतर पीडित मुलीचा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून अनेक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच माजी खासदार निलेश राणे यांनी जळीत प्रकरणातील आरोपीला जागेवरच ठार मारा अशी मागणी केली आहे.
याबाबत निलेश राणेंनी ट्विट करुन म्हटलंय की, हिंगणघाटातल्या आमच्या बहिणीचा जीव गेला. पोलिसांना बंदुका फक्त हवेत गोळी मारायला दिल्या आहेत काय? त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा. एक उदाहरण होऊ द्या की महाराष्ट्रात मुलींना/महिलांना नाय त्या नजरेने कोणीही बघू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूने महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकारनेही घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेतील पीडितेवर उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत. या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो. महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता- भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
'असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही असा कायदा करू'
दरम्यान, 'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा' असं म्हणत पीडित तरुणीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुलीला त्वरीत न्याय मिळाला पाहिजे अशा भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.
आज ती जळाली नाही समाज व्यवस्थेचा बुरखा जळाला"
अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस
हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.
काय आहे प्रकरण?पीडित तरूणी व आरोपी एकाच गावचे आहेत. आरोपी हा तरुणीपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी हे दोघेही हिंगणघाटला सहप्रवासी होते. एकाच गावातून दररोज बसने ये-जा असल्याने दशकापासून त्यांची मैत्री होती. उच्च शिक्षणासाठी पीडिता वर्ध्याला गेल्यावर या मैत्रीत खंड पडला. यादरम्यान विकेशचे लग्न झाले.
शिक्षण आटोपून पीडिता हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकविण्यासाठी रूजू झाली. या दरम्यान आरोपी विकेशने मैत्री कायम ठेवण्यासाठी पीडितेकडे आग्रह धरला होता. तीन महिन्यांपूर्वी पीडितेच्या पित्याने विकेशला समजविण्याचा प्रयत्न केला. यावरून तो चिडला होता. माझ्याशी व्यवस्थित वागत असताना वडिलांना माहिती का दिली यावरून विकेश चिडला होता. तेव्हापासूनच तो सूड घेण्याच्या मनस्थितीत होता. त्यानंतर आरोपीने पीडितेला पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
'त्या' नराधमाला कडक शिक्षा होईल : जयंत पाटील
"ताई तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे"
मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यात लक्ष घालावे : चंद्रकांत पाटील
रुग्णवाहिका अडवून नागरिकांनी पोलिसांवर केली दगडफेक
"त्या' गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे'