हिंगणघाट (वर्धा)/ नागपूर - हिंगणघाटमधील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माथेफिरू तरुणाने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हिंगणघाट पीडितेला सरकारने मदतीचा हात दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. 'माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा' असं म्हणत पीडित तरुणीच्या आईने संताप व्यक्त केला आहे.
पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला पेट्रोल टाकून जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'मुलीची अवस्था बघवत नाही. ती हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा. मुलालाही त्याच वेदना झाल्या पाहिजेत' असं पीडित तरुणीच्या आईने म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतताप्रिय जिल्ह्याला सोमवारी हिंगणघाट येथील क्रूर घटनेने गालबोट लागले. महाविद्यालयात निघालेल्या 24 वर्षीय प्राध्यापक तरुणीला भर रस्त्यावर लोकांच्या समोरच पेट्रोल टाकून पेटवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
भाजपाच्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी सोमवारी (3 फेब्रुवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तरुणीला जाळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच विकृतांना कायद्याची, पोलिसांची भीती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून आरोपीला कडक शासन तर पीडितेला न्याय मिळवून द्यावा असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 'जालन्याची घटना ताजी असतानाचं वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे सकाळी भर रस्त्यावर नांदोरी चौकात एका शिक्षिका असणाऱ्या युवतीला जिवंत जाळण्याचा गंभीर प्रकार घडलाय ज्यात युवती गंभीर जखमी झालेली आहे. राज्यात कायदा सुरक्षेचे धिंडवडे निघताना दिसताहेत' असं ट्विट त्यांनी केलं.
'विकृतांना कायद्याची, पोलिसांची भीती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून आरोपीला कडक शासन तर पीडितेला न्याय मिळवून द्यावा. महिला सुरक्षा फक्त भाषणात नको तर प्रत्यक्षात हवी ही राज्यातील भगिनींना अपेक्षा आहे' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. दोन युवक दुचाकीने पळून गेल्याची माहिती एका विद्यार्थिनीने पोलिसांना दिली. त्यानंतर सकाळी 10.30 च्या सुमारास विकेश ऊर्फ विक्की ज्ञानेश्वर नगराळे, (रा. दरोडा, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा) याला अटक केली. नंतर हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन केले. विकेश विवाहित असून, त्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न का केला, हे मात्र कळू शकले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...
Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण
Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित
जवानांना आवश्यकतेनुसार जेवण, कपडे मिळत नाहीत; कॅगचा ठपका!