मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली.
या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झाल्याचे भावनिक ट्विट करत या 'हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, "माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय... महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया."
गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र, तिची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. 7 फेब्रुवारीला तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही आणि अखेर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.
आणखी बातम्या...
हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे
'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी