हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 01:00 PM2019-07-11T13:00:18+5:302019-07-11T13:02:53+5:30
आघाडीला वंचितवर पर्याय काढतानाच विजयासाठी आणखी काही मार्ग शोधावे लागणार आहेच. त्यामुळे हिंगोलीत गेमचेंजर ठरू पाहणारी वंचित बहुजन आघाडी सध्या तरी युतीसाठी फायदेशीर ठरेल असं चित्र लोकसभेच्या निकालावरून दिसत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत सौता सुबा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील मतदारांना चांगलेच आकर्षित केले. लोकसभेला दलित-मुस्लीम एक्य घडवून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला चांगलेच जेरीस आणले. आता विधानसभा निवडणुकीतही वंचितने आक्रमक भूमिका घेतल्याने आघाडीच्या आडचणी वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात वंचित गेमचेंजर म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. येथे भलेही वंचित खातं उघडू शकेल का यावर प्रश्नचिन्ह असले तरी ते आघाडीचा खेळ बिघडवू शकतात, हे निश्चित.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने हिंगोलीत शानदार विजय मिळवला. ऐनवेळी शिवसेनेतून भाजप आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये दाखल झालेले सुभाष वानखेडे यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या पराभवाचे अंतर वंचित बहुजन आघाडीमुळे चांगलेच वाढले. लोकसभेला हिंगोलीत येणाऱ्या सर्वच्या सर्व सात मतदार संघात वंचितने प्रभावी कामगिरी केली असून काँग्रेसची पारंपरिक मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली.
विधानसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये हिंगोली, कळमनुरी आणि वसमत मतदार संघांचा समावेश आहे. २०१४ मध्ये या तीनही मतदार संघात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत या तीनही मतदार संघांत वंचितने २० हजारहून अधिक मते घेतली आहेत. तर काँग्रेसला तिन्ही मतदार संघात मिळालेली मते आणि वंचितची मते एकत्र केले तरी शिवसेनेचे अर्थात युतीचे मताधिक्य अधिकच असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान लोकसभेची स्थिती विधानसभेला कायम राहिल याची शक्यता धुसर असली तरी, आघाडीला वंचितवर पर्याय काढतानाच विजयासाठी आणखी काही मार्ग शोधावे लागणार आहेच. त्यामुळे हिंगोलीत गेमचेंजर ठरू पाहणारी वंचित बहुजन आघाडी सध्या तरी युतीसाठी फायदेशीर ठरेल असं चित्र लोकसभेच्या निकालावरून दिसत आहे.