पुणे : गुरुत्व लहरींचा अभ्यास करणा-या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी (लायगो) या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेची उभारणी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील विविध संशोधन संस्था व विद्यापीठांचे सहकार्य मिळणार आहे.अमेरिकेमध्ये दोन लायगो वेधशाळा यापुर्वीपासून गुरुत्वीय लहरींचा वेध घेत आहेत. त्यामुळे भारतात होणारी ही अमेरिकेबाहेरील पहिली व जगातील तिसरी वेधशाळा ठरणार आहे. महाराष्ट्रतील हिंगोली जिल्ह्यात ही वेधशाळा उभारण्याबाबत मागील काही महिन्यांपासून हालचाली सुरू आहेत. मात्र, अद्याप अधिकृतपणे ठिकाणाची घोषणा करण्यात आलेली नाही. लायगो वेधशाळेने मागील वर्षी दोन मोठ्या कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरूत्वीय लहरींचा पहिल्यांदाच शोध लावला होता. या संशोधनाला यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील नवीन वेधशाळेचे ठिकाणी निश्चित झाले असून त्यावर कामही सुरू करण्यात आले आहे. जेव्हा ही वेधशाळा २०२५ मध्ये कार्यान्वित होईल. त्याचे व्यवस्थापन ‘आयुका’कडे असेल, असे पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्टॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)चे संचालक सोमक रायचौधरी यांनी सांगितले. भविष्यात वेध घेतल्या जाणाºया गुरूत्वीय लहरींचे मुळ शोधण्यासाठी या नवीन अत्याधुनिक वेधशाळेची मदत होणार आहे. लहरींच्या संशोधनासाठी उच्च कौशल्याची गरज असते. त्यासाठी या क्षेत्रातील संशोधकांना उच्च स्तरीय प्रशिक्षण देता येणार आहे. केवळ वेधशाळा उभारण्यासाठीच नव्हे तर २०२५ नंतर त्यामध्ये संशोधनासाठी किमान शंभर तरूण संशोधकांची गरज आहे, अशी माहिती रायचौधरी यांनी दिली.
‘लायगो’ वेधशाळा २०२५ पर्यंत उभारणार, हिंगोलीचे नाव आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 3:16 AM