लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : वनविभागातील महिला वनपाल शीला बडे यांनी नऊवारी साडी नेसून रायगडावरील अवघड हिरकणी कडा सर केला. सोलापूर सामाजिक वनीकरण विभागात महिला वनपाल असलेल्या शीला बडे यांनी ‘हिरकणी’ हा सिनेमा पाहिला होता, तेव्हापासून त्यांनी हा कडा सर करायचा असा संकल्प केला होता. मुंबईच्या शिलेदार संस्थेने मोहीम जाहीर केल्यावर त्यांनी यात सहभाग नाेंदविला.
७ मार्चच्या या मोहिमेत राज्यभरातून ५७ जण सहभागी झाले, त्यात ३५ महिला होत्या. साडीमध्ये वनपाल बडे यांच्यासह महिला पोलीस मोनिका जाधव व अन्य एक जण सहभागी झाली होती. हा कडा सर केल्यानंतर बडे म्हणाल्या, जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो, असं वर्णन रायगडावरील हिरकणी कड्याचं करण्यात आलं आहे. साडेसात वाजता कडा चढाईची मोहीम सुरू झाली. हिरकणीवाडीपासून या कड्याची उंची ४,२६७ फूट आहे. साडेअकरा वाजता बुरुजावर पोहोचलो, असे त्या म्हणाल्या.
अन् अंगावर आले शहारे...हिरकणीने बाळाच्या ओढीने हा अवघड कडा कसा उतरला असेल याचा अनुभव या मोहिमेत घेता आला. केवळ एक पाय ठेवण्याइतपत जागा होती. सुरक्षेसाठी दोर होता म्हणून आम्ही पुढे जाण्याचे धाडस करीत होतो. पण, त्या हिरकणीने ही चढण कशी पार केली असेल याचा अंदाज घेताना अंगावर शहारे येत होते, असे बडे यांनी सांगितले.