ऑनलाइन लोकमतएरंडोल, दि. 5 - महाभारतकाळात एकचक्रनगरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या एरंडोल या शहराला ऐतिहासिक दरवाजे व खिडक्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. शिल्पकलेतून साकारलेले अनेक दरवाजे विविध भागात आहेत. बाहेरून दगडी कोटबांधणी असलेल्या अंजनी नदीच्या तिरावर वसलेल्या या शहरात बुधवार दरवाजा, अमळनेर दरवाजा, देवगिरी दरवाजा, कासार दरवाजा उर्फ कासोदा दरवाजा, चार दरवाजा, रंगारी खिडकी यांचेसह इतर काही दरवाजे इतिहासाचे साक्षीदार आहेत.चार दरवाजा (चौक):-चार दरवाजा (चौक) हा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. हा दगडी दरवाजा असून त्यावरील शिल्पावर नक्षी तसेच इतर कला प्रकार कोरलेले आहेत. हे चारही दरवाजे एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत. या दरवाजातूनच संपूर्ण रहदारी होत असल्याने बदलत्या परिस्थितीत तो आता तोकडा पडत आहे. कासोदा दरवाजाहा दरवाजा आता पडका झाला असला तरी त्याच्या दोन्ही बाजूस भव्य असे बुरुज आहेत. या दरवाजाच्या आत शिरून थोड्या अंतरावर गेल्यावर पांडववाड्याची भव्य वास्तू पाहावयास मिळते. या दरवाजास पूर्वी कासार दरवाजा असेही म्हणत असत.देवगिरी दरवाजा हा दरवाजा अंजनी नदी काठावर आहे. नदी पात्रातून गावात शिरण्यासाठी १०० फूट लांब व ३० फूट उंच असा धक्कावजा दगडी रस्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतेहून परतल्यावर या दरवाजामार्गे त्यांनी प्रस्थान केल्याची माहिती मिळते.रंगारी खिडकी (दरवाजा)या दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवगिरी दरवाजाप्रमाणे दगड वजा फरशी बसविण्यात आली आहे. हा दरवाजा पुरा भागाच्या मध्यवर्ती भागात येण्याचे प्रवेशद्वार आहे.अमळनेर दरवाजा येथे एक बुरुज असून हा दरवाजा अमळनेरला जाण्याचा मार्ग आहे. शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी चारही बाजूने तटबंदी होती. परंतु कालौघात ती नष्ट झालेली आहे.याशिवाय गांधीपुरा भागात पद्मालय दरवाजा, बेलदार दरवाजा, कागदी दरवाजा आदी पडलेले, पाडून टाकलेले आणि पडक्या स्थितीत अस्तित्त्वात असलेले असे काही दरवाजे आहेत. एरंडोलवासी या दरवाजांचा इतिहास आठवत कालक्रमण करीत आहेत. ( वार्ताहर)
ऐतिहासिक दारे खिडक्यांचे शहर एरंडोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 9:22 PM