मुंबई- सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प असून त्यामध्ये शेती, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मिती यावर भर देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी व्यक्त केली. देशाच्या अर्थसंकल्पाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन केलं.
शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव, दहा कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी प्रत्येकी पाच लाख रुपयांची आरोग्य उपचारांसाठी तरतूद असलेली जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना, शेती – ग्रामीण पायाभूत सुविधा - आरोग्य सुविधा अशा विविध प्रकारे ग्रामीण क्षेत्रासाठी विविध खात्यांमार्फत एकूण साडेचौदा लाख कोटींची तरतूद, तरुणांना रोजगार निर्मितीस मदत करण्यासाठी मुद्रा योजनेत यंदा तीन लाख कोटी रुपयांची भरघोस तरतूद, सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद अशी अनेक वैशिष्ट्ये या ऐतिहासिक अर्थसंकल्पाची आहेत. गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठीचे उद्दीष्ट वाढवून आता आठ कोटी करण्यात आले आहे. छोटे आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले आहे. समाजाच्या सर्व घटकांचा विचार करतानाच देशाचा आर्थिक विकास गतीने होईल याचीही काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होतानाच सर्वसामान्य माणसाला त्यामध्ये महत्त्वाचे स्थान देणारा आणि विकासाच्या संधी मिळवून देणारा हा अर्थसंकल्प आहे, असं प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.