कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला सामना आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या २८१ धावांच्या खेळीमुळे भारताला विजय मिळवता आला. पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या ४४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव १७१ धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने भारताला फोलोऑन देऊन पुन्हा फलंदाजीची संधी दिली. भारताने दुस-या डावात ६५७ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८३ धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावात आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने १७१ धावांची नोंद केली.
१९८६ साली मद्रासच्या चिंदबरम स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला पहिला कसोटी सामना टाय झाल्यामुळे अविस्मरणीय ठरला. भारताला या सामन्यात विजयासाठी ३४८ धावांचे लक्ष्य गाठायचे होते. भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ३४७ धावांची बरोबरी केल्याने सामना टाय झाला.
१९८१ साली मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताने एका शानदार विजयाची नोंद केली. भारताने पहिल्या डावात २३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात ४१९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे १८२ धावांची आघाडी होती. भारताचा दुसरा डाव ३२४ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १४२ धावांचे सोपे लक्ष्य होते. पण कपिलदेव यांनी भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ८२ धावात आटोपला. भारताने ५९ धावांनी विजयाची नोंद केली.
भारताने १९८० साली पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका जिंकली. १९७३ नंतर ब-याच काळाने भारताने कसोटी मालिका विजय मिळवला. मद्रासच्या चेपॉक स्टेडिमवर झालेला हा पाचवा कसोटी सामना भारताने १० विकेटने जिंकला. सुनिल गावस्करांची १६६ धावांच्या खेळी या सामन्याचे वैशिष्टय होते.
वेस्टइंडिजमध्ये पहिला कसोटी विजय मिळवल्यानंतर १९७६ साली पाचवर्षानंतर भारताने त्याच पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर आणखी एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला कसोटी विजयासाठी ४०२ धावांची आवश्यकता होती. भारताने सुनील गावस्कर (१०२) मोहिंदर अमरनाथ (८५) आणि विश्वनाथ (११२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर कसोटी ४०२ धावांचे लक्ष्य पार करुन ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
कसोटीत परदेशात पहिला विजय मिळवल्यानंतर त्याचवर्षी इंग्लंडमध्ये भारताने कसोटी मालिका जिंकली. परदेशातील भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय होता. ओव्हल कसोटीत भारतसमोर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य होते. अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने तीन गडी राखून कसोटीसह मालिका जिंकली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण होता.
परदेशात वेस्ट इंडिजमध्ये भारताने पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली. पोर्ट ऑफ स्पेनला झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला.
१९६७ साली लीडसच्या मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये झालेला कसोटी सामना कायम अविस्मरणीय राहिला. प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंडने जेफ बॉयकॉटच्या नाबाद २४६ धावांच्या बळावर ५५० धावांचा डोंगर उभारला. भारताचा पहिला डाव १६४ धावात गुंडाळल्यानंतर इंग्लंडने फोलोऑन दिला. भारताचा सहज पराभव होईल असा इंग्लंडचा अंदाज होता. पण कर्णधार नवाब अली पतोडी (१४८) अजित वाडेकर (९१) एफएम इंजिनीयर (८७) यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने ५१० धावा केल्या. इंग्लंडला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. १२५ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडने सहा गडी राखून हा सामना जिंकला.
कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर भारताने १९५२ साली चेन्नईमध्ये पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली. कर्णधार विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कसोटी सामना एक डाव आणि ८ धावांनी जिंकला होता.
१९३२ साली कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध ऐतिहासिक ५०० वा कसोटी सामना खेळत आहे. २५ जून १९३२ रोजी इंग्लंडच्या लॉडर्स स्टेडियमवर डग्लस जार्डीनच्या इंग्लिश संघाविरुद्ध भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळला. आपल्या कसोटी करीयरला सुरुवात केली. इंग्लंडने ही कसोटी १५८ धावांनी जिंकली होती.