ऑनलाइन लोकमत
परिंचे( पुणे), दि. १२ - पुरंदर तालुक्याच्या दक्षिण टोकाला निरा नदीच्या तीरावर वसलेले तोंडल हे गाव. याठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सामाजिक सलोख्याची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आजही भक्तीभावाने जपली जात आहे. मोहरमच्या वेळी सर्व मुस्लिम नागरिक याच मंदिरात दोन दिवस ताबूत बसवतात. यावेळी सर्व ग्रामस्थ ताबूताचे दर्शन घेतात. तर मुस्लिम कुटुंब नवरात्रात देवीचा उपवास करतात.
सर्व गावाचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दीडशेहून अधिक लोक उपवास करतात. नवरात्रात येथून तुळजापूरला देवीची पालखी घेऊन जातात. तेथे देवाची पालखी व भक्तांचे विशेष स्वागत करण्यात येते. गावाचे वैशिष्ट्य असे की देवीच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये येथील अहमद इनामदार, रझ्झाक इनामदार, निसार इनामदार, जावेद इनामदार गुलाब दस्तगीर इनामदार, रमजान इनामदार, रफिक मोकाशी, लतिफ मोकाशी, सोहेल इनामदार, , फिरोज इनामदार, व इतर मुस्लिम कुटुंबे मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने सहभागी होतात. यावेळी नवरात्र संपत असतानाच मोहरम आला आहे. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांना भावनिक किनार लाभली आहे. दसऱ्याच्या दिवशी मंदिरात ताबूत बसवले आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करण्यात येईल. असे काशिनाथ वणवे यांनी सांगितले.
तैयद रमजान इनामदार यांनी सांगितले की अनेक ठिकाणी उपचार घेऊनही डोळ्यांचे अवघड दुखणे बरे होत नव्हते. उपचार बंद झाल्यानंतर देवीच्या अाशीर्वादानेच मला पुन्हा दिसू लागले. अशी माझी श्रद्धा आहे. हा माझ्यासाठी चमत्कार होता, असे मी मानतो. तेव्हापासून गेली अठ्ठावीस वर्षे मी देवीचा उपवास करतो. संपूर्ण नवरात्र काळात मंदिरात असतो.
तोंडल हे गाव पुनर्वसित गाव आहे. वीर धरणामुळे हे गाव सध्याच्या ठिकाणी वसले आहे. जुन्या गावात नदीच्या काठी तुळजाभवानी मातेचे मंदिर होते, असे सरपंच रत्नमाला साबळे यांनी सांगितले. गावाच्या विकासाचे सर्व निर्णय याच मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन घेतात असे दिगंबर वणवे यांनी सांगितले. गावामध्ये आजही मश्जिद नसून त्याची गरजही जाणवत नाही असे दस्तगीर इनामदार यांनी आवर्जून सांगीतले. मंदिरामध्येच दरवर्षी ताबूत बसवण्याचा कार्यक्रम होतो.