महेश सरनाईक : :सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वराज्य रक्षणार्थ सागरी नाकेबंदीची नितांत आवश्यकता आहे, ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने हेरली आणि अरबी समुद्रात सागराच्या लाटा झेलणारा सिंंधुदुर्गचा किल्ला उभा केला. छत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत आज हा जलदुर्ग डौलाने उभा आहे; पण शासनाचे दुर्लक्ष आणि पुरातत्त्व विभागाची उदासीनता यामुळे साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व आणि दरवर्षी ढासळत चाललेली तटबंदी पाहता या समृद्ध शिवलंकेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे राज्य ताब्यात घेऊन आणि अफझलखानाला मारून शिवाजी महाराज सैन्यांसह कोकणात उतरले. त्यांनी स्वराज्याची हद्द समुद्राला भिडविली. आदिलशहाची ठाणी काबीज करून महाराज मालवण किनाऱ्यावर आले. तेव्हा कोकणची स्थिती भयानक होती. आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीजांचे अत्याचार, जबरदस्तीने होणारी धर्मांतरे, मंदिरांची तोडफोड, कोकणातील स्त्री-पुरूषांना एकत्रित पकडून परदेशात गुलाम म्हणून केली जाणारी रवानगी हा कोकण प्रांतातला नेहमीचा प्रकार होता. शिवरायांना नियतीने दिलेले हे आव्हान होते. त्याला महाराजांनी दिलेले अचूक व परिणामकारक उत्तर म्हणजे, त्यांनी बांधलेला हा जलदुर्ग. अप्रतिम दुर्गबांधणी व अष्टावधानाचे प्रतिक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला २४ नोव्हेंबरला तब्बल ३५0 वर्षे पूर्ण झाली. मार्गशिर्ष शके १५८६ व्दितीय म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ हा दिवस महाराजांनी किल्ल्याच्या मुहूर्ताचा पहिला दगड बसविण्यासाठी निवडला. किल्ल्याच्या बांधकामासाठी सुरत लुटून मिळविलेले एक कोटी होन खर्च केले. मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी आहे, तेथे किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले. या ठिकाणाला मोरयाचा धोंडा म्हणून पुढे प्रसिद्धी मिळाली. या ऐतिहासिक दगडावर गणपती, चंद्र, सूर्य, शिवलिंग यांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. या ठिकाणी विधिवत गणेश पूजन व सागर पूजन केले. समुद्राला नारळ अर्पण करून सिंधुदुर्ग किल्ल्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर शिवाजी महाराज नौकेतून कुरटे बेटावर गेले. त्यांनी तिथे मुहूर्ताचा पहिला दगड बसविला. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली.मालवणच्या सागरी किनाऱ्यावर दगड-खडकांनी वेढलेल्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग आहे. या किल्याचे क्षेत्र ४१ एकर असून, घेर दौन मैल आहे. किल्ल्यास ३२ बुरूज आहेत. तटाची रूंदी सरासरी १0 फूट आहे. तटबंदी नागमोडी वळणाची असून, शत्रूवर तोफा आणि बंदुका यांचा परिणामकारक मारा करण्यासाठी तटाची रचना कौशल्यपूर्ण केली.शिवाजी महाराजांचा पराक्रम व कर्तृत्वाची गाथा जगाला सांगण्यासाठी अरबी समुद्रात हजारो कोटींचे शिवस्मारक उभारले जाणार आहे; परंतु शिवछत्रपतींची शौर्यगाथा या शिवस्मारकात ध्वनी-प्रकाश किरणांच्या कार्यक्रमाद्वारे दाखविण्याऐवजी कोकण किनारपट्टीवर पर्यटक बोटसेवा सुरू करून जलदुर्गांची सफर घडविल्यास या किल्ल्यावरील प्रत्येक बुरूज मर्द मावळे, रजपूत, भंडारी, गाबितांची आरमारी शौर्यगाथा सांगेल. शिवस्मारकावर खर्च करण्याऐवजी किल्ल्यांची ढासळलेली तटबंदी पुन्हा बांधली, तर शिवरायांचा हा इतिहास उजळून निघेल.पुरातत्त्व विभागाची उदासीनतासंस्कृती व पर्यटनाचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याबाबत शासन आणि पुरातत्त्व विभाग उदासीन आहे. ढासळत चाललेले बुरूज, पडझड झालेली तटबंदी, वैराण माळरान, जीर्ण ऐतिहासिक ठेवे, मंदिरांची दुरवस्था, सोयी-सुविधांचा अभाव, प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे बकाल चित्र पर्यटकांमार्फत जगासमोर जात आहे. हे बदलण्याची मागणी होत आहे.अडीच लाख पर्यटक देतात भेटसिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी मार्च ते मे आणि आॅक्टोबर ते फेब्रुवारी अशा पर्यटक हंगामात सुमारे २.५0 लाख पर्यटक येथे येत असतात. मालवणातही पर्यटन व्यवसाय वाढला. साडेतीनशे वर्षानंतरही सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व वाढतेच आहे. मालवणचे वाढलेले पर्यटन, जमिनींचे वाढलेले भाव, रोजगाराच्या उपलब्ध झालेल्या संधी या सर्वांत किल्ल्याचे महत्त्व आधुनिक युगातही कायम आहे. पावसाळ्यातील उधाण त्सुनामीसारखी परिस्थिती, अरबी समुद्राच्या अजस्त्र लाटा अंगावर झेलत हा जलदुर्ग मालवण शहराचे रक्षणही करीत आहे.सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी १६९५ मध्ये स्थापन केलेले एकमेवाव्दितीय, असे शिवछत्रपतींचे मंदिर आहे. हेच खरेखुरे शिवछत्रपतींचे स्मारक आहे. या स्मारकाची जपणूक व्हावी.शिवप्रेमींच्या मागण्यासिंधुदुर्ग किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरविला जावामंदिर आणि ऐतिहासिक ठेव्यांचा जीर्णोद्धार व्हावाकिल्ल्याची पडझड थांबवावीकिल्ल्यावर प्रशस्त उद्यान बांधावेकिल्ल्यावर वृक्ष लागवड करावीकोकण किनारपट्टी बोट सुुरूकरावी
सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५0 वर्षांचा इतिहास
By admin | Published: December 09, 2014 10:11 PM