यवतमाळ : इतिहास संशोधक, लेखक आणि सेवानिवृत्त शिक्षक अरुण अनंतराव हळबे सर यांचे सोमवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मंगला, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष अद्वैत आणि पुणे येथे उद्योजक असलेले आशिष ही दोन मुले, प्रणिती नितीन जोशी ही मुलगी असा परिवार आहे. उद्या मंगळवारी सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.येथील टिळकवाडी परिसरात वास्तव्य असलेल्या हळबे सरांचा जन्म २८ मे १९३४ रोजी झाला. यवतमाळच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमधून शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. ‘शतकातलं यवतमाळ’ हा संशोधन ग्रंथ लिहून त्यांनी यवतमाळच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून दिली. लोकमत मीडिया प्रा. लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा आणि लोकमत मीडिया प्रा. लि.चे एडिटर इन चीफ माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे ते शिक्षक होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून, ‘डरकाळी’ हे शिकार कथा, प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे ‘गाणहिरा’, तसेच लोकनायक बापूजी अणे यांचे ‘लोकनायक’ हे चरित्रग्रंथ त्यांनी लिहिले. यासोबतच अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केले. ‘लोकमत’मधून सातत्याने ‘शतकातलं यवतमाळ’ हे सदर त्यांनी लिहिले. या सदराचे पुस्तकही निघाले. सावरकरप्रेमी असलेले हळबे सर वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. भारत सरकारने ‘राष्ट्रपती पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला.
इतिहास संशोधक अरुण हळबे यांचे अल्पशा आजाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 5:51 AM