सुरेश लोखंडे,ठाणे- राज्यातील बहुतांशी सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये श्रीमंत असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (टीडीसी) आता हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. त्यांच्या नेतृवाखालील बहुजन विकास आघाडीच्या सुनीता दिनकर या बँकेच्या उपाध्यक्षा असून अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे सध्या त्याच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. सुमारे सात हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या बँकेवर ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे १० संचालक आहेत. त्यांनी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सात संचालकाचे पाठबळ मिळवले आहे. या १७ संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान बँक अध्यक्ष बाबाजी पाटील यांचा पाठिंबा काढून घेऊन अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी ५ एप्रिल रोजी विशेष सभा बोलवली आहे. मात्र, सभेला तोंड देण्याऐवजी पाटील यांनी ३० मार्च रोजीच अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अविश्वास ठरावाचा प्रसंग टाळला. यामुळे बहुमत असलेल्या १७ संचालकांनीया विशेष सभेत पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा बँक वर्तुळात आहे.२१ संचालकांच्या या टीडीसी बँकेवर सध्या १९ संचालक कार्यरत आहेत. बँकेचे संचालक असलेल्या शिवसेनेचेमाजी आमदार कृष्णा घोडा व राष्ट्रवादीचे संचालक अशोक पोहेकर यांचे निधन झाले आहे. यामुळे बँकेवर सद्य:स्थितीला १९ संचालक आहेत. त्यात ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या १० संचालकांची बँकेवर मगरमिठी आहे. त्यात त्यांनी भाजपा-शिवसेनेच्या सात संचालकांशी जवळीक साधली आहे. शिल्लक राहिलेले राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील व सुभाष पवार या दोन संचालकांनी आताच मैदान सोडले आहे. यामुळे बँकेच्या पुढील तीन वर्षांच्या सत्तेसाठी हितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत. या सत्तेसाठी प्रारंभी किंवा शेवटी भाजपाला अध्यक्षपदाचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.तत्पूर्वी, बुधवारच्या या विशेष सभेत विद्यमान अध्यक्ष पाटील यांचा राजीनामा स्वीकारून तो डीडीआर यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. >१४ दिवसांत निवडणूक : सहकार निवडणूक आयुक्त सुमारे १४ दिवसांत या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक लावणार आहेत. या दरम्यान बँक संचालकांमध्ये होणाऱ्या घडामोडी वाखाणण्याजोग्या ठरू शकतात. एक मात्र नक्की, सध्याच्या स्थितीला बँकेवर बहुजन विकास आघाडी व भाजपा-सेनेचा वरचष्मा दिसून येत आहे.
ठाणे जिल्हा बँकेवर आता हितेंद्र ठाकुरांचे वर्चस्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 4:11 AM