नवी दिल्ली - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) कोडगे लोक राजीनामा देत नाही. हिटलरनेही सु्द्धा राजीनामा दिला नाही तर त्याने आत्महत्या केली. जगभरातही ज्या लोकांनी बेकायदेशीर राज्य केले त्यांना हुसकावून बाहेर काढले आहे किंवा ते पळून गेले आहे हा इतिहास सांगतो, माझे कुणावरही व्यक्तिगत मत नाही. एकनाथ शिंदेंसारखे खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्रावर राज्य करतायेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
संजय राऊत म्हणाले की, भाजपाने लिहून दिलेले भाषण वाचणे यापलीकडे त्यांच्याकडे काय काम राहिले नाही. कोविड घोटाळ्याचा विषय काढायचा असेल तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोविड काळात केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याची चौकशी करावी असं पत्र शिंदे गटातील आमदाराने लिहिलं आहे. ते पत्र माझ्याकडे आहे. माझे संबंधितांशी बोलणे झाले आहे. त्या २७०० कोटींच्या घोटाळ्याचे धागेदोरे गुलाबराव पाटील यांच्याकडे पोहचतात. चिमणआबा पाटील या शिंदेंना दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? भ्रष्टाचाराने तुमची मांडी चेपली आहे. त्यामुळे चिमणआबा पाटील यांनी केलेल्या कोविड काळातील घोटाळ्याची चौकशी करा. त्यानंतर मुंबई महापालिकेत कोविड काळात काय घडले, कुणामुळे घडले जे आज तुमच्यासोबत बसले आहेत त्यांच्याबद्दल पुराव्यानिशी माहिती देऊ असा इशारा त्यांनी दिला.
त्याचसोबत ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार आणि तेव्हाचे स्थायी समिती अध्यक्ष भाषणावेळी त्यांच्या मागेच बसले होते. कोविड असेल वा अन्य कुठल्याही घोटाळ्याचा आरोप केला जातो, त्याचे टेंडर ज्यांनी काढले ते सगळेच शिंदे गटासोबत आहेत. नाव घ्यायची असेल तर आता नाव घेईन. सगळे टेंडरबाज लोक राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबासोबत सहभागी आहेत. आपण कुणाविषयी आणि काय बोलतोय याचे भान मुख्यमंत्र्यांना असायला हवे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
१४३ खासदारांनी लोकशाहीसाठी बलिदान दिलं
आमचा लढा व्यक्तीविरोधात नाही, देशाचे संविधान वाचवण्यासाठी लढा आहे. देशातील लोकशाही, कायदा, संसद,संसदीय लोकशाही, घटनात्मक संस्था यांचे रक्षण करण्यासाठी १४३ खासदारांनी स्वत:चे बलिदान दिले आहे हे विसरू नका. जे लोक एका व्यक्तीच्या रक्षणासाठी उभे आहेत. त्यांनी स्वत:चा अंतरआत्मा तपासून पाहावा. या देशात सध्या जे चाललंय ते त्यांना मान्य आहे का असा सवाल संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना विचारला.संजय राऊत म्हणाले की, याच लोकांचे पूर्वज म्हणजे पूर्वीचे नेते त्यांनी आणीबाणीविरोधात का लढा दिला होता हे त्यांनी समजून घ्यावे. १४३ खासदारांची ज्यापद्धतीने मुंडकी उडवली आहेत का यावर भाष्य करावे.लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान केले आहे. लोकशाहीचे रक्षणकर्ते त्यांचे बलिदान ज्यांनी दिले हे पाहता लोकशाहीचे मंदिर पायदळी तुडवले त्यांना राम मंदिराचा सोहळा करून राजकारण करण्याचा अधिकार नाही हे आमचे स्पष्ट मत आहे असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, प्रभू श्री राम देशाचे राजे होते, लोकशाही राज्य होते. त्याची लढाई रावणासोबत होती. शत्रूचा आदर करावा ही रामनिती आहे. सध्या रामभक्तांना हा विचार मान्य आहे का? लोकशाहीच्या मंदिरात तुम्ही हत्याकांड करायचे, हौताम्य द्यायचे आणि दुसरीकडे राम मंदिराच्या भजनात सामील व्हायचे यासारखा देशाचा अपमान दुसरा काहीच नाही. तसेच ज्यांनी राम मंदिरासाठी त्याग केला, त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, आम्ही, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले जाणार नाही. ज्यांचे योगदान नाही त्यांचा हा सोहळा आहे अशी टीका राऊतांनी केली.