ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २२ : शुन्य गाठायचे आहे हे उद्दीष्ट घेऊन राज्यातील एड्स नियंत्रण संस्था वेगाने कामला लागल्या आहेत. एचआयव्ही प्रतिबंधासाठी व्यापकस्तरावर जनजागृती व आरोग्य विषयक कार्यक्रमांचा भडीमार सुरू आहे प्रत्यक्षात मात्र या रूग्णाच्या तपासणीसाठी राज्य शासनाची उदासिनता समोर आली आहे. एचआयव्हीसंदर्भातील तपासणी करण्यासाठी तब्बल दोन वर्षापासुन कुठल्याही साहित्याचा पुरवठाच राज्य शासनाने केला नाही. त्यामुळे अशा तपासणीसाठी स्थानिक प्रशासनाकडून साहित्याची उसनवारी करण्याची वेळ एडस् नियंत्रण व प्रतिबंधक विभागावर आली आहे. राज्यातील ४३ लाखावर रूग्णांना याचा फटका बसला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा रूग्णालयात एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग सुरू केला आहे. या विभागांतर्गत एआरटी सेंटर, लिंक एआरटी सेंटर, आयसीटीसी सेंटर, कार्यान्वित आहे. या केंद्राअंतर्गत 'एचआयव्ही'ची तपासणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तपासणीसाठीचा साहित्याचा पुरवठा मागील दोन वषार्पासून झालेला नाही. राज्यात १९ लाख् ९२ हजार १६ गर्भवती माता तसेच २३ लाख ७० हजार ३७६ इतर रूग्णांची एचआयव्ही तपासणीचे उद्दीष्ट यावर्षी आहे
सोडीयम हायप्रोक्लोराईट, व्हॅक्यूअम ट्यूब विथ निडल्स, सिरिंज, मायक्रोटिप्स, हॅन्डग्लोज, डिस्पोजीबल पिप्लेटस आदी साहित्याची एचआयव्ही तपासणी करण्यासाठी गरज भासते. या साहित्याचा दोन वर्षापुर्वी राज्य एडस् नियंत्रण व प्रतिबंधक विभाग पुरवठा करीत असले. आता हा पुरवठा शासनाच्या आरोग्य विभागाडे दिला असून तो दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे एचआयव्ही चाचणीसाठी जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रूग्णालयातून साहित्य मागण्याची वेळ आली आहे.