- सुधीर लंके, अहमदनगरपिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिके घेणे बंद करण्याचा निर्णय हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. बारा वर्षांनंतर येथील शेतकऱ्यांनी अशी सुटी घेतली आहे.हिवरेबाजारने जलसंधारण केल्यामुळे या गावाला १५ वर्षांत टॅँकरचे दर्शन घडलेले नाही. उन्हाळ्यातही गाव विहिरीतील पाण्यावर पिके घेते. यावर्षी मात्र टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गतवर्षी गावात केवळ ३०९ मिमी पाऊस पडला. अशाही परिस्थितीत गावाने खरीप हंगाम शंभर, तर रब्बी हंगाम ६० टक्के घेतला आहे. गावातील ३४८ विहिरींपैकी नव्वद टक्के विहिरींना आजही पाणी आहे. मात्र, हे पाणी उपसले, तर उन्हाळ्यात टंचाई भासू शकते. त्यामुळे गावाने आता पावसाळ्यापर्यंत नवीन पीक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय यापूर्वी २००३ मध्ये घ्यावा लागला होता. या निर्णयामुळे त्या वेळी टॅँकर टळला होता. भोयरेपठार, भोयरे खुर्द, निवडंगेवाडी ही गावेही पिके घेणे बंद करण्याचा विचार करत आहेत.विहिरीत ३० फुटांपर्यंत पाणी आहे. दररोज अडीच रुपयांत प्रत्येक घराला ५०० लीटर पाणी नळाद्वारे दिले जात आहे. यात खंड पडणार नाही, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.प्रत्येक गावाने संघटितपणे पाण्याचे व्यवस्थापन केले, तर आपण टॅँकरला फाटा देऊ शकतो. प्रत्येक गावात तीन-चार विहिरींना तरी पाणी असते. या विहिरींचे पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी न उपसण्याचा निर्णय झाला तरी अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. - पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, राज्य आदर्श गाव समिती
हिवरेबाजारचे शेतकरी सुटीवर!
By admin | Published: March 30, 2016 12:45 AM