मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्म आणि आध्यात्मात स्त्री-पुरुष समानतेची भूमिका ठरवण्यापूर्वी धर्माचार्य किंवा शंकराचार्य यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे हिंदू जनजागृती समितीने स्पष्ट केले आहे. राजस्थानमधील नागौर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये बोलताना भैयाजी जोशी यांनी महिलांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारण्याचे काहीच कारण नाही, असे प्रतिपादन केले होते. त्यास हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतला आहे. राजकीय निर्णय हे संसदेत लोकनियुक्त जनप्रतिनिधी करतात, तसे धर्मविषयक निर्णय धर्मसंसदेत व्हायला हवेत. तसे न होता, संघटनांच्या व्यासपीठावर ते होऊ लागल्यास उद्या मोठा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मंदिरात महिलांच्या प्रवेशाविषयी संघाने जाहीर केलेल्या भूमिकेने धर्मशास्त्र खोटे ठरून धर्मबुडव्या पुरोगाम्यांना आयते बळ मिळणार आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केला आहे. उद्या हे पुरोगामी मग विद्यापीठांतून केवळ भारतमातेच्या बर्बादीच्या घोषणा आणि महिषासूर जयंतीपुरते मर्यादित न राहता, धर्मशास्त्रच बदलून टाकतील. शनिदेवाच्या मंदिरात चोरी करायला चला, असे आव्हान देणारे अंनिसवाले उद्या थेट शनिदेवच नाहीत, असे म्हणायला मागे-पुढे पाहणार नाहीत. काँग्रेसच्या पाठिंब्याने महिलांच्या मंदिरांतील प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई यांच्यासमोर हिंदुत्ववादी संघाला माघार घ्यावी लागली, असा संदेश हिंदू समाजात जाणार नाही, याची काळजी संघाने घ्यावी, असेही समितीने म्हटले आहे. (प्रतिनिधी)फुल पँटवरून सुनावले गणवेशात हाफच्या जागी फुल पँट करण्याचा निर्णय संघाने विचारविनिमय करून घेतला. गणवेश बदलण्यासाठी इतकी वर्षे विचार करणारा संघ, धर्मशास्त्रीय प्रथा-परंपरा यात बदल करण्याची भूमिका इतक्या घाईने का घेत आहे, असा प्रश्नही समितीने विचारला आहे.
संघाच्या भूमिकेला हिंदू जनजागृतीचा विरोध!
By admin | Published: March 14, 2016 2:20 AM