- विदर्भ राज्य परिषदेचा ठराव
अकोला : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची १ मे रोजी संपूर्ण विदर्भात होळी करण्याचा ठराव विदर्भ राज्य परिषदेमध्ये बुधवारी पारित करण्यात आला. माजी आमदार वामनराव चटप, माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे आणि इतर विदर्भवादी नेत्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र विदर्भाच्या चर्चेसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने २0 एप्रिल रोजी अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र विदर्भाशी संबंधित विविध मुद्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सुरू करण्यात येणाºया आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आयोजित या परिषदेमध्ये माजी आमदार अॅड. वामनराव चटप, महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवादी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकूण ७ ठराव पारित करण्यात आले. वैदर्भीय जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता भाजपने केली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी होळी करण्याचा ठरावही यावेळी पारित करण्यात आला.