अकोला: केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने विदर्भ राज्य निर्मितीबाबत दिलेले आश्वासन पाळले नसल्याने, १ मे रोजी, महाराष्ट्र दिनी, २0१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या जाहीरनाम्याची विदर्भातील सर्व जिल्हय़ांमध्ये होळी करून, सरकारचा निषेध करण्याचा ठराव, बुधवारी अकोल्यात पार पडलेल्या विदर्भ राज्य परिषदेत पारित करण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात माजी आमदार वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विदर्भ राज्य परिषदेत सात ठराव घेण्यात आले. ह्यअभी नही तो कभी नहीह्ण अशा शेवटच्या टप्प्यात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन छेडावे लागणार असून, आपण वेगवेगळ्या संघटनांमध्ये असलो तरी, सर्वांचे अंतिम ध्येय स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे आहे. विदर्भ राज्यासाठी सुरू करण्यात आलेला लढा हे सतीचे वाण म्हणून ह्यजिकू किंवा मरूह्ण या भावनेने स्वीकारले आहे, असे विचार माजी आमदार वामनराव चटप यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचा वणवा जेव्हा पेटेल, तेव्हा त्याचा भडका कोणत्याही नेत्याला थांबवता येणार नाही. विदर्भ राज्याचा लढा अंतिम लढा आहे. एवढय़ा पोषक वातावरणात विदर्भ राज्य निर्मिती झाली नाही, तर आणखी ३0 वर्षे थांबावे लागेल. त्यामुळे हा लढा यशस्वी करा, असे आवाहन माजी महाधिवक्ता अँड. श्रीहरी अणे यांनी केले. सन १९0५ पासून विदर्भातील जनता शांतपणे विदर्भ राज्य मागत आहे; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही; परंतु आता विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही, हा आमचा मंत्र झाला पाहिजे, असे नमुद करून, त्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी लढा देण्याची गरज अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी अधोरेखित केली. महाराष्ट्राची दिवाळखोर परिस्थिती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहून विदर्भातील शेतकर्यांना काहीच मिळणार नाही. त्यासाठी विदर्भ राज्य निर्मितीची गरज असून, याच वर्षी हा लढा जिंकायचा आहे, असे विचार राम नेवले यांनी मांडले.
भाजपच्या जाहीरनाम्याची करणार होळी
By admin | Published: April 21, 2016 2:33 AM