कुमार बडदे,
मुंब्रा- बेघर होण्याच्या भीतीमुळे पारसिक बोगद्यावरील वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी अतिक्रमणे तोडण्याच्या नोटिसा स्वीकारण्यास नकार दिला. काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे वसाहतीमधील रहिवाशांनी घेतलेल्या या संघर्षाच्या पवित्र्यामुळे त्यांना हटवताना प्रशासनाला बळाचा वापर करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.सात दिवसांपूर्वी पारसिक बोगद्यावरील संरक्षक भिंतीचा काही भाग खचल्याची घटना उघडकीस आली होती. स्थानिक नागरिकांनी दाखवलेली सतर्कता तसेच ठामपा आणि मध्य रेल्वेच्या प्रशासकीय यंत्रणांनी तत्परता दाखवून वेळीच धोकादायक भिंतीचा भाग तोडल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर, प्रशासनाने सुरक्षितता म्हणून बोगद्यावरील उदयनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना हटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून ठामपाचे कर्मचारी रहिवाशांना घरे तोडण्याच्या नोटिसा देण्यासाठी गेले होते. रहिवाशांनी त्या नोटिसा घेण्यास नकार दिला. या कर्मचाऱ्यांनी काही घरांमध्ये टाकलेल्या नोटिसाही त्यांना परत दिल्या. बोगद्यावरील संरक्षक भिंत खचली असली तरी घरांना मात्र हानी पोहोचलेली नाही. त्यामुळे घरे सुरक्षित असल्याचे तेथील रहिवाशांचे ठाम मत आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेली घरे प्रशासकीय दबावाखाली खाली न करण्याचा निर्णय घेत त्यांनी नोटिसा घेतल्या नसल्याची माहिती समाजसेविका संगीता पालेकर यांनी लोकमतला दिली.