ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 18 - शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महानगरपालिकेला निवेदने देऊनही रस्ता दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने मंगळवारी छावा संघटनेच्या पदाधिका-यांनी खर्डेकर स्टॉप समोरच्या रस्त्यावर खड्ड्यांतच होम हवन करून अनोखे आंदोलन केले. भर रस्त्यात सुरु असलेले हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती.
लातूर शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तर काही नागरिक या खड्ड्यांमुळे गंभीर जखमी झाले आहेत. या भागात अशा अनेक अपघाताच्या घटना झाल्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे-पाटील यांच्या उपस्थितीत जीवघेण्या खड्ड्यांमध्येच होम हवन करून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
खड्डे दुरुस्तीला पैसे नाहीत तर दार्जिलिंगला कुठून आले ?
जेव्हा पालिका प्रशासनाकडे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली जाते तेव्हा दुरुस्तीला पैसे नसल्याचे पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी सांगतात. पालिकेकडे पैसे नाहीत तर अर्ध्याहून अधिक नगरसेवक मनपाच्या पैशावर दार्जिलिंगला कसे काय जातात ? असा सवाल विजयकुमार घाडगे यांनी विचारला. नगरसेवक अशी सहलीवर उधळपट्टी करीत असतील तर विकासावर खर्च करायला पैसे कसे राहतील ? असेही ते म्हणाले. जर अशा गांधीगिरीने महापालिका प्रशासन भानावर येऊन रस्ते दुरुस्त करणार नसेल तर त्यांना ‘छावा स्टाईल’ आंदोलनाने धडा शिकविला जाईल, असेही ते म्हणाले. या आंदोलनावेळी आकाश पाटील, राहुल मुळे, बाळासाहेब जाधव, गणेश गोमचाळे, सोनेराव शिंदे, संजू राठोड, बालाजी निकम, मनोज फेसाटे, सुधीर भोसले, अमोल जाधव, निलेश बाजुळगे, सुधीर साळुंके, रघुनाथ पवार, राम फेसाटे, मुन्ना जाधव, किरण पाटील, ऋषिकेश सूर्यवंशी, सलिम शेख, रवि मेकले यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.